पाटणा : बिहारमधील ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी सिकंदर यादवेंदू याने गुन्हा केल्याचा कबुलीजबाब दिला आहे. ‘नीट’ परीक्षेच्या आदल्या दिवशी ‘तयारी’ करवून घेण्यासाठी चार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली होती आणि त्यासाठी प्रत्येकाकडून चाळीस लाख रुपयांची मागणी केली होती, असे त्याने मान्य केले आहे.
‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी दररोज नव्या बाबी उघड होत आहेत. या प्रकरणात अनेक बड्या व्यक्ती गुंतल्या असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ‘नीट’चे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून, विविध ठिकाणी झालेल्या गैरप्रकारांचा तपास सुरू आहे. बिहारमधील सरकारी विश्रामगृहातील तीन खोल्या आरक्षित करून तिथे विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका लिहून घेतल्याचे दिसून आले आहे.
या प्रकरणी राज्य सरकारने एका कार्यकारी अभियंत्यासह तीन जणांना निलंबित केले आहे. पाटणा विमानतळापासून जवळच असलेल्या या विश्रामगृहातील खोल्या आरक्षित करण्यासाठी ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांचे स्वीय सचिव प्रीतम यादवेंदू यांच्या मोबाईलचा वापर झाल्याचा आरोप होत आहे. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी प्रीतम यादवेंदू यांचे नातेवाईक सिकंदर यादवेंदू याला पोलिसांनी अटकही केली आहे. याच सिकंदरने गुन्हा केल्याचे मान्य केले असल्याने तपासाच्या दृष्टीने मोठे पाऊल पडले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक झाली आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान सिकंदर याने प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या नितीशकुमार आणि अमित आनंद यांच्याशी संबंध असल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले आहे. या दोघांशी संगनमत करून त्याने सरकारी विश्रामगृहातील तीन खोल्या आरक्षित केल्या आणि ‘नीट’ परीक्षेच्या आदल्या दिवशी आयुष कुमार, अनुराग यादव, अभिषेक कुमार आणि शिवनंदन कुमार या चार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली. यापैकी अनुराग हा सिकंदरचा पुतण्याच आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रीय जनता दलात वाद सुरू झाला आहे. अटक करण्यात आलेला सिकंदर यादवेंदू हा राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचे स्वीय सचिव प्रीतम यादवेंदू यांचा नातेवाईक आहे. खोल्या आरक्षित करण्यासाठी प्रीतम यांच्याच फोनचा वापर झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराचा ‘राजद’शी संबंध आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी केला. ‘राजद’ने मात्र आरोप नाकारले आहेत. ‘देशभरात परीक्षेवरून आरोप होत असताना भाजप केवळ बिहारचा मुद्दा का लावून धरत आहे? हरियानात भाजपच्या मंत्र्याच्या शाळेतील सहा विद्यार्थी टॉपर कसे आले? याप्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा,’ अशी मागणी मनोज झा यांनी केली.
तयारी’साठी चाळीस लाख रुपये
सिकंदर हा बिहारमधील दिनापूर ग्राम परिषदेत कनिष्ठ अभियंता या पदावर काम करतो. त्याने नितीशकुमार आणि अमित आनंद यांच्याशी संपर्क साधत चार विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यायची असल्याचे सांगितले. या चौघांकडून सिकंदरने चाळीस लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यामागे ३२ लाख रुपये नितीशकुमार आणि अमित आनंद यांना द्यायचे होते. यादव हा राजस्थानमधून परीक्षा देणार होता. सिकंदरने दिलेली प्रश्नपत्रिकाच प्रत्यक्ष परीक्षेला आली होती, असेही त्याने नंतर कबूल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.