आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या राजकारणात भाजपला पुन्हा एकदा धक्का देण्यात यश मिळवले. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होत आतिशी मारलेना यांच्या हाती सूत्रे सोपवण्याचा प्रस्ताव केजरीवाल यांनी मांडला. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत सापडलेल्या केजरीवाल यांनी पुन्हा एकदा 'पर्सेप्शन'च्या लढतीत भाजपला धक्का दिला.
२०१४ पासून सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवणाऱ्या बलाढ्य भाजपला दिल्लीतील सत्ता मात्र सतत हुलकावणीच देत आहे. याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय खेळी.
२०१३ मध्ये दिल्लीत सत्ता मिळवण्याचा भाजपचा मार्ग आम आदमी पार्टीने रोखला. केजरीवाल यांनी त्या निवडणुकीत मुलांची शपथ घेत दावा केला होता की भाजप व काँग्रेसशी युती करणार नाही. त्या निवडणुकीत दिल्लीमध्ये त्रिशंकू अवस्था झाली. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता स्थापन केली. पण ४९ दिवसांनंतर हे सरकार पडले.