स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी नायजेरिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना इच्छुक असल्याची माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी. बी. अनंतकृष्णन यांनी आज दिली. या देशांबरोबर यासंदर्भात बोलणी सुरू आहेत, असेही त्यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, की तेजस हे भारतीय बनावटीचे हलके लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी नायजेरिया, फिलिपिन्स आणि इजिप्त हे देश उत्सुक आहेत. मात्र, या विमानातील काही घटक ब्रिटनने पुरविले असल्याने अर्जेंटिनाशी विमानांचा खरेदी कसा करायचा, यासंदर्भात मार्ग शोधला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. १९८२च्या फॉकलंड युद्धानंतर ब्रिटनने अर्जेंटिनावर लष्करी विक्रीसंदर्भात निर्बंध लादले आहेत. विशेषत: ब्रिटनकडून निर्मिती केलेल्या लष्करी उपकरणांची अर्जेटिनाला विक्री केली जात नाही. त्या पार्श्वभूमीवर अनंतकृष्णन यांनी हा खुलासा केला.
ब्रिटनने अर्जेंटिनावर लादलेल्या या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने पुरविलेल्या उपकरणांचा समावेश असलेल्या तेजस विमानाची विक्री करणे, भारतासाठी सोपे नसेल. नुकतीच जुलैमध्ये अर्जेंटिनाच्या संरक्षणमंत्र्यांनी संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढविण्यासाठी भारताचा दौरा केला होता. ‘एचएएल’नेही अर्जेंटिनाच्या हवाई दलाशी दोन टनांच्या हेलिकॉप्टरची सेवा पुरविण्यासंदर्भात करार केला होता.
अर्जेटिनाबरोबरच भारताचे फिलिपिन्सबरोबरचे संरक्षण सहकार्यही वृद्धिंगत होत आहे. यावर्षीच्या सुरुवातीला, जानेवारीत फिलिपिन्सने ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या तीन बॅटऱ्यांच्या खरेदीसाठी भारताशी सुमारे ३७५ दशलक्ष डॉलरचा करार केला होता.
‘तेजस’ हे भारताचे स्वदेशी बनावटीचे एकच इंजिन असणारे बहुआयामी विमान असून ते हवेच्या धोकादायक वातावरणातही सक्षम राहू शकते. हवाई संरक्षण, समुद्रात हेरगिरी करण्याच्या आणि हल्ल्यात भूमिका बजावण्याच्या दृष्टीने या विमानाचा आराखडा बनविण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाचा मुख्य आधार बनण्यासाठी हे विमान सज्ज असून सुरुवातीच्या टप्प्यात दलात ४० विमानांचा समावेश करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने २०२१ मध्ये हवाई दलासाठी ८३ तेजस विमानांच्या खरेदीसाठी ४८ हजार कोटींचा करार केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.