नवी दिल्ली- फरार उद्योजक नीरव मोदीसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दाखल करण्यात आलेल्या दोन प्रकरणात आता त्याची छोटी बहीण आणि तिच्या पतीने साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथील विशेष न्यायालयाने साक्षीच्या बदल्यात त्यांना माफी देण्याची मागणी करणारी याचिका मंजूर केली आहे.
मागील महिन्यात नीरवची बहीण पूर्वी मेहता आणि तिचा पती मयंक मेहता यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांनी स्वतःला नीरव मोदीपासून दूर ठेवू इच्छित असल्याचे आणि त्याची आणि त्याच्याशी निगडीत व्यवहाराशी निगडीत काही महत्त्वाची माहिती आणि ठोस पुरावे देऊ शकतो, असे म्हटले होते. पूर्वीकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. तर त्यांचे पती ब्रिटीश नागरिक आहेत.
दोघांनी न्यायालयात म्हटले की, नीरव मोदीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे आमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य उद्धवस्त झाले आहे. आम्ही ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंगच्या दोन प्रकरणात साक्षीदार बनू इच्छितो. यात आम्ही काही असे खुलासे करु इच्छितो की, ज्यामुळे नीरव मोदी आणि इतर आरोपींविरोधात आरोप सिद्ध होण्यात महत्त्वाचे ठरु शकतात.
पंजाब नॅशनल बँकेला बनावट अंडरटेकिंगच्या माध्यमातून 6498.20 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी आणि इतर आरोपींविरोधात सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहे. पूर्वी आणि मयंकला सीबीआयने आरोपी केलेले नाही. परंतु, ईडीने दोघांची नावे या प्रकरणाशी जोडले होते. दोघे साक्षीदार होण्यास ईडीने आक्षेप नोंदवलेला नाही. पण एखाद्या आरोपी कंपनी किंवा संस्था साक्षीदार होण्यास ईडीने आक्षेप नोंदवला आहे.
पूर्वी आणि मयंक यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेले नियम आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर लादण्यात आलेल्या बंदीमुळे आम्ही भारतात येऊ शकलेलो नाहीत. पण आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवू शकतो. यापूर्वी ऑक्टोबरमध्येही ईडीला दिलेल्या जबाबात त्यांनी सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. पूर्वीविरोधात इंटरपोलने एक रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तर न्यूयॉर्क आणि लंडन येथील त्यांची संपत्तीही ईडीने जप्त केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.