बालासोर : ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून येथील विविध रुग्णालयांमध्ये शंभरपेक्षाही अधिक मृतदेह ठेवण्यात आले आहेत. या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी ‘एम्स’ भुवनेश्वरमधील तज्ज्ञांनी डीएनए चाचणीचा आधार घेतला आहे.
येथील पाच कंटेनरमध्ये या मृतदेहांचे जतन केले जात आहे. सध्या कोणत्याही स्थितीमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कारांची घाई केली जाणार नाही कारण या कंटेनरमध्ये सहा महिन्यांपर्यंत मृतदेहांचे जतन केले जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली. एम्स भुवनेश्वरमध्ये आतापर्यंत १२३ मृतदेह ठेवण्यात आले होते त्यातील ६४ जणांची ओळख पटली आहे.
मृतांच्या नातेवाइकांचा संताप
उपेंद्रकुमार शर्मा यांच्या मृतदेहाची सोमवारी ओळख पटविण्यात आली होती पण मंगळवारी त्यांचा मृतदेह दुसऱ्याकडे सुपूर्द करण्यात आल्याने त्यांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीच्या ताब्यात दिला जात असेल तर त्याला काय अर्थ आहे? उपेंद्र यांच्या हातावरील टॅटूवरून त्यांची ओळख पटल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
डीएनए सॅंपलिंगचा अहवाल मिळण्यासाठी किमान आठवडाभराचा तरी वेळ लागतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातामध्ये मरण पावलेले सर्वाधिक प्रवाशी हे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांतील आहेत.
‘एनडीआरएफ’च्या जवानांना त्रास
बालासोर दुर्घटनेतील मदत आणि बचाव कार्यात सहभागी झालेल्या ‘एनडीआरएफ’च्या जवानांवर देखील या दुर्घटनेचे शारीरिक आणि मानसिक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. अनेकांना भ्रम होऊ लागले असून काहींची भूख देखील मंदावली आहे. या मदत आणि बचाव कार्यात सहभागी झालेल्या जवानांचे नंतर समुपदेशन केले जाणार असून त्यांचे आरोग्य पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
चाळीस प्रवाशांना विजेचा धक्का?
अपघातग्रस्त कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांतून बाहेर काढण्यात आलेल्या चाळीस मृतदेहांवर कोठेही जखम झाली नसल्याचे आढळून आले असून या सर्वांचा मृत्यू विजेच्या धक्क्यामुळे झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी सरकारी रेल्वे ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यामध्ये या अपघातात ओव्हरहेड वायर तुटून ते पाच डब्यांमध्ये अडकल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे, त्यामुळे डब्यातील अनेक प्रवाशांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
‘एनडीए’च्या सरकारने रेल्वे आणि केंद्राचा अर्थसंकल्प एक केल्याने रेल्वेवरचा फोकस संपला. भाजप सरकारची ही सर्वांत मोठी चूक होती. रेल्वेच्या सुरक्षिततेऐवजी अधिक वेगाच्या गाड्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. आता पुन्हा रेल्वे अर्थसंकल्प आणणे गरजेचे आहे.
- एम. वीरप्पा मोईली, काँग्रेसचे नेते
व्यवस्थेचे अपयश लपविण्यासाठी आता हेडलाईन मॅनेज केल्या जात आहेत. ओडिशातील भीषण अपघात होऊन ९६ तासांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला असताना देखील जबाबदारी का निश्चित केली जात नाही? आता सरकार या अपघाताभोवती घातपाताच्या कथा रचण्याचे काम करत आहे.
- सुप्रिया श्रीनेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.