Olympic Games
Olympic Gamessakal

Olympic Games : ऑलिंपिक यजमानपदाचे लक्ष्य;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देताना दिले संकेत

भारत २०३६ मधील ऑलिंपिक आयोजनाचा प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याबद्दलचे संकेत देण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असलेल्या खेळाडूंशी ऑनलाइन संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले, ऑलिंपिकमध्ये सहभागी होत असताना तेथील आयोजनाचा आढावा घ्या.
Published on

नवी दिल्ली ­­: भारत २०३६ मधील ऑलिंपिक आयोजनाचा प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याबद्दलचे संकेत देण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असलेल्या खेळाडूंशी ऑनलाइन संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले, ऑलिंपिकमध्ये सहभागी होत असताना तेथील आयोजनाचा आढावा घ्या. २०३६ मधील ऑलिंपिक आयोजनासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. तुमच्याकडून मिळालेली माहिती ऑलिंपिक आयोजन यशस्वी होण्यासाठी मोलाची ठरणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन व्हिडीआेद्वारे भारतीय खेळाडूंना ऑलिंपिकसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सर, हॉकी, नेमबाजी या खेळांतील खेळाडू उपस्थित होते. तसेच भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा व केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया हेही उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी या वेळी भारतीय खेळाडूंकडे आवाहन केले की, ऑलिंपिकदरम्यान तुमची स्पर्धा सुरू असताना फक्त खेळाकडे लक्ष द्या, पण तुम्हाला मोकळा वेळ मिळाल्यास तेथील वातावरण, सुविधा, व्यवस्थापनावर नजर टाका. आपण २०३६ मधील ऑलिंपिक आयोजनासाठी प्रयत्न करीत आहोत. ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धांच्या आयोजनात आपण कुठेही कमी पडलो नाही पाहिजे.

नीरज चोप्रा याने भारतीय पथकात असलेल्या इतर खेळाडूंचा आत्मविश्‍वास वाढवला. तो म्हणाला, टोकियो हे माझे पहिले ऑलिंपिक होते, पण माझा सराव चांगला झाला होता. त्यामुळे बिनधास्त होऊन स्पर्धेत उतरलो. सुवर्णपदक पटकावले. मला भारतीय खेळाडूंना एवढेच सांगावेसे वाटते की, कुणालाही घाबरू नका. स्वत:वर विश्‍वास ठेवा. युरोपियन किंवा अमेरिकन ही आपल्यासारखीच माणसे आहेत. आपण प्रदीर्घ काळ कुटुंबीयांपासून दूर राहतो. ५० किलो वजनी गटात सहभागी होणारी महिला बॉक्सर निखत झरीन हिनेही देशवासीयांचा विश्‍वास सार्थ ठरवायचा आहे, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच भारतीय हॉकीपटूंकडून सलग दुसरे पदक पटकावण्याची इच्छा बोलून दाखवण्यात आली. दरम्यान महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सलग तिसरे पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करीन, असे विश्‍वासाने सांगितले.

आईने बनवलेला चुरमा खायचाय

नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्रा याच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी नीरजकडे चुरमा खाण्याबाबत आठवण केली. नीरजने हरियानाचा चुरमा आणणार असल्याचे त्यांना सांगितले, पण मोदी यांनी आईच्या हाताने बनवलेला चुरमा हवा असल्याचे नीरजला सांगितले. नीरजने मोदी यांना चुरमा देण्याचे वचन दिले.

१५ ऑगस्टला भेटू

नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकविजेती कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याचसोबत पॅरिस ऑलिंपिक संपल्यानंतर १५ ऑगस्ट अर्थातच स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये खेळाडूंना बोलावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आश्‍वासनही नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.