नवी दिल्ली : ‘‘कोरोनाचा नवा प्रकार (व्हेरियंट) ओमिक्रॉन उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. प्रत्येक नागरिकाची सजगता आणि स्वयंशिस्तीच्या जोरावर देश या संकटाचा मुकाबला करेल,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरत्या वर्षाच्या ‘मन की बात’च्या अंतिम भागामध्ये व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर भारत १०० वर्षात आलेल्या सर्वांत मोठ्या साथीचा मुकाबला करू शकला आहे.’’ जगातील इतर देशांच्या तुलनेत लसीकरणाची भारताची कामगिरी उजवी असल्याचे सांगतानाच मोदींनी, ओमिक्रॉन विरोधात सजगता आणि स्वयंशिस्त ही मोठी शक्ती आहे, ही शक्तीच कोरोनाला पराभूत करेल, असा विश्वास बोलून दाखवला.
‘सरेंडर एअरगन’
अरुणाचल प्रदेशात पक्ष्यांची शिकार रोखण्यासाठी सुरू असलेल्या ‘एअरगन सरेंडर मोहिमे’चा पंतप्रधान मोदींनी आवर्जून उल्लेख केला. अरुणाचल प्रदेशात पक्ष्यांच्या ५०० हून अधिक प्रजाती आहेत. मात्र त्यांची संख्या घटल्यामुळे शिकारीसाठी वापरली जाणारी बंदुक जमा करण्याचे ‘सरेंडर एअरगन’ अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत १६०० हून अधिक ‘एअरगन’ जमा करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
सरकारी खात्यांत स्वच्छता मोहीम
सरकारी कार्यालयांमध्ये जुनी कागदपत्रे, फायलींचे संगणकीय प्रतींमध्ये रूपांतर केले जात असून या स्वच्छता मोहिमेमध्ये काही गमतीशीर गोष्टी घडल्याचे मोदी म्हणाले. टपाल खात्याच्या या स्वच्छता मोहिमेत अडगळीचे गुदाम स्वच्छ झाले. त्याचे रूपांतर बैठकीचे ठिकाण आणि कॅफेटरियामध्ये करण्यात आले. तर आणखी एक जागा मोकळी होऊन त्या ठिकाणी आता वाहनतळ झाल्याचे मोदींनी सांगितले.
पुण्याच्या ‘भांडारकर’ संस्थेचे कौतुक
भारतातील प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्ये जगभरात लोकप्रिय असल्याचे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या अभ्यासक्रमाकडे लक्ष वेधले. मोदी म्हणाले, ‘‘या संस्थेने बाहेरच्या देशातील नागरिकांना महाभारताचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. यातील आश्चर्याची बाब म्हणजे, हा अभ्यासक्रम अलीकडच्या काळात सुरू झाला असला तरी त्यात शिकविली जाणारी माहिती तयार करण्याचे काम १०० वर्षांपूर्वी सुरू झाले होते. संस्थेच्या या अभ्यासक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.’’ आपली परंपरा आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे सादर करता येऊ शकते आणि सातासमुद्रापलीकडे पोहोचविता येऊ शकते यासाठी कल्पक प्रयत्न केले जात असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी यावेळी काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.