श्रीनगर : भारतीय हद्दीत घुसखोरीचा पाकिस्तानचा कट आज सुरक्षा दलांनी उधळून लावला. जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीत रायफलमॅन मोहित राठोड हे हुतात्मा झाले तर एका मेजर समवेत चार जवान हे जखमी झाले आहेत. ही चकमक माछील सेक्टरच्या जवळ असलेल्या जंगलात झाली. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये एक दहशतवादी ठार झाल्याचे समजते.
पाकिस्तानची ‘बॉर्डर अॅक्शन फोर्स’ (बॅट) या परिसरामध्ये दहशतवाद्यांना घुसविण्याचा प्रयत्न करत होती, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कुपवाडाच्या कमकारी भागामध्ये सुरक्षा दलांना या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागला. हे दहशतवादी समोर येताच चकमकीला तोंड फुटले. या चकमकीनंतर काही दहशतवाद्यांनी जंगलामध्ये पलायन केल्याचे बोलले जाते. सध्या या भागामध्ये लष्कराची शोध मोहीम सुरू आहे. कारगिल विजय दिनाला २६ वर्षे पूर्ण झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये विविध ठिकाणांवर कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. त्या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाला आहे.
संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध
डेसाच्या डोंगराळ भागामध्ये फिरणाऱ्या काही संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे डोडा पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याच भागामध्ये १५ जुलै रोजी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक कॅप्टन आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह पाच जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यामध्ये याच संशयित दहशतवाद्यांचा हात असल्याचे समजते.
ओडिशातील तुकड्या जम्मूत
जम्मू- काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन तुकड्या या ओडिशातून जम्मूला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या तुकड्यांमध्ये दोन हजारांपेक्षाही अधिक जवान आहेत. या जवानांना सांबा आणि जम्मू-पंजाब सीमेवर तैनात करण्यात आले आहे. दिल्ली आणि जम्मूमध्ये लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.