कोलकता : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना शिक्षा करणाऱ्या राज्य सरकारच्या विधेयकाला विरोध करीत गोंधळ घातल्याप्रकरणी पश्चिम बंगाल विधानसभेचे सभापतींनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अब्दुल मन्नान यांना निलंबित करण्यात आले.
या विधेयकाला कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचा विरोध आहे. हे विधेयक अत्यंत कठोर असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त करीत त्याला विरोध करण्यास सुरवात केली आहे. खासदार असताना ममता बॅनर्जी यांना सिंगूरमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर 30 नोव्हेंबर 2006 मध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या आमदारांनी विधानसभा डोक्यावर घेतली होती, याकडे लक्ष वेधल्यानंतर आज विधानसभेत तणाव निर्माण झाला. कॉंग्रेसचे नेते मन्नान आणि अन्य कॉंग्रेस नेते आणि डाव्या आघाडीच्या नेत्यांनी 2006 मध्ये तृणमूल कॉंग्रेसने कशा प्रकारे विधानसभा डोक्यावर घेतली होती, त्याची छायाचित्रे बुधवारी विधानसभेत आणण्याचा प्रयत्न केला. त्याला तृणमूल कॉंग्रेसने विरोध केला.
विधानसभा अध्यक्ष विमन बंडोपाध्याय यांनी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांना या प्रकारची छायाचित्रे घेऊन येण्यास नकार दिला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते अब्दुल मन्नान यांनी अध्यक्षांच्या विरोधाला न जुमानता छायाचित्र घेऊन सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले आणि मार्शलच्या मदतीने त्यांना सभागृहाबाहेर काढले.
|