नवी दिल्ली : स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांपैकी कॉंग्रेसने तब्बल ६५ वर्षे देशावर राज्य केले. मात्र या पक्षाचे सारे लक्ष एका व एकाच घराण्याची मदत, त्यांचे भले करणे व त्यांनाच लाभ पोचविण्याकडे होते, असा हल्लाबोल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज राज्यसभेत केला. देशाचा ‘अमृतकाळ’ खरोखरच सुरू आहे पण राहुल (गांधी) असेपर्यंत कॉंग्रेस पक्षाचा मात्र ‘राहू काळ' (अशुभ काळ) यापुढेही सुरूच राहणार आहे, असे त्यांनी सांगताच जोरदार गदारोळ झाला. (Nirmala Sitharaman)
सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अमृत काळाचा उल्लेख करताच काही कॉंग्रेस खासदारांनी बसल्या बसल्याच, ‘हा तर राहू-काळ म्हणजे अत्यंत अशुभ काळ चालला आहे,‘ टिप्पणी केली. त्यानंतर भडकलेल्या सीतारामन यांनी राहुल गांधींवर व्यक्तिशः हल्ला चढवत त्यांना कॉंग्रेसच्या ‘राहु‘ची उपमा दिली. या घायाळ करणाऱ्या वाक्बाणांनंतर राज्यसभेत शांतता राहणे केवळ अशक्य होते व तसेच झाले. काही काळाने सीतारामन यांनी पुन्हा उत्तर देण्यास सुरवात कली. सीतारामन यांनी काही आकडेवारी देण्यास सुरवात करताच कॉंग्रेस सदस्यांनी भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सीतारामन भडकल्या व त्यांनी कॉंग्रेसवर प्रहार केले. गरीबी ही एक मानसिक अवस्था आहे, या राहुल गांधी यांच्या जुन्या जाहीर वक्तव्याचा दाखला देऊन त्या म्हणाल्या की ‘ही यांची गरीबांबाबतची मानसिकता आहे. कॉंग्रेसचा राहुल काळ चालल्यानेच आज तुम्ही ४४ जागांवर आला आहात. हे चालूच राहणार आहे. राहुल गांधी २०१३ मध्ये म्हणाले होते की गरीबी ही मानसिकता आहे. ती प्रत्यक्षात नसतेच. अन्नाची कमतरता, पैसा व भौतिक वस्तूंचीही कमतरता ही गरीबी नाहीच.
एखाद्याकडे आत्मविश्वास असेल तर तो गरीबी दूर करू शकतो, असेही राहुल गांधी म्हणाले होते, त्याचा दाखला देऊन सीतारामन म्हणाल्या, की संबंधित कॉंग्रेस खासदारांचे नाव मी घेणार नाही, पण असे उद्गार कोणाचे आहेत-असतील हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्याबरोबर सत्तारूढ बाकांवर हास्यकल्लोळ उसळला तर कॉंग्रेसच्या बाकांवरील आरडाओरडा वाढला. यापुढील २५ वर्षांना ‘अमृतकाळ' म्हणण्यास आम्हाला काहीही संकोच होत नाही कारण आमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत व एका विशिष्ट घराण्याचेच भले करण्याची धडपड आम्ही करत नाही, असे सांगून त्यांनी डिजिटल बजेट अशी टीका करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. आमच्याकडे देशाच्या शतकमहोत्सवासाठी काही योजना नसतील तर गेल्या ७० वर्षांत देशाचे जे हाल आर्थिक आघाडीवर झाले त्यांचीच पुनरावृत्ती होईल. ७० वर्षांत सरकारांकडे एका घराण्याचे भले करण्याशिवाय काही व्हीजन होते की नाही अशी शंका यावी अशी देशाची आर्थिक अवस्था आहे.
कोरोनामुळे देशाच्या जीडीपीला ९ लाख ५७ हजार कोटींचा फटका बसला. मात्र पुरवठ्याच्या आघाडीवर आलेल्या अडथळ्यांव्यतिरिक्तही देशाचा महागाई दर ६.२ टक्क्यांवर रोखून धरण्यात मोदी सरकारला यश आले आहे. यापुढील काळात 'पीएम गती शक्ती मिशन' मुळे पायाभूत सुविधांत समन्वय राहील व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.