पाकने पापे धुवावीत; चांगला शेजारी होण्याचा प्रयत्न करावा; जयशंकर

संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भारताकडे
Pak should wash away sins Try to be good neighbor Jaishankar un
Pak should wash away sins Try to be good neighbor Jaishankar un e sakal
Updated on

न्यूयॉर्क : जगाच्या दृष्टीने पाकिस्तान हा ‘दहशतवादाचे केंद्रस्थान’ आहे. त्याने त्यांची पापे धुतली पाहिजे आणि चांगला शेजारी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे,’’ असा इशारेवजा सल्ला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी (ता.१५) दिला. मूळ धोका कोठून उद्‍भवला आहे, हे जग विसरलेले नाही, असेही ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा समितीचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ‘ग्लोबल काउंटर टेरेरिझम अप्रोच ः चॅलेंजेस अँड वे फॉरवर्ड’ या परिषदेचे नेतृत्व केल्यानंतर संयुक्त राष्ट्रां (यूएन)च्या मुख्यालयात जयशंकर पत्रकारांशी बोलत होते.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी भारतावर आरोप करताना ‘भारताने ज्याप्रमाणे दहशतवादाचा वापर केला आहे, तसा अन्य कोणत्याही देशाने केलेला नाही, असे विधान केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, ‘‘खान काय म्हणाल्या, याबाबतचे अहवाल मी पाहिले आहेत आणि वाचले आहेत. यावरून मला आठवतेय की, अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यावेळी रब्बानी या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या. त्यांच्याशेजारी बसलेल्या हिलरी क्लिंटन म्हणाल्या होत्या, की अमेरिकेच्या ‘एखाद्याने अंगणात साप पाळला तर तो केवळ शेजारील लोकांनाच चावेल, असे नाही तर पाळणाऱ्यांनाही तो चावेल. पण पाकिस्तानला चांगले सल्ले ऐकण्याची सवय नाही. त्यामुळे तेथे काय चालले आहे, ते तुम्ही पाहतच आहात.’’

‘‘ते (पाकिस्तान) काहीही म्हणू देत, पण सर्व लोक, सर्व जग त्यांच्याकडे दहशतवादाचे केंद्र म्हणून पाहत आहेत, हे सत्य आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, की आपण गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाशी लढा देत आहोत आणि यामुळे आठवणी थोड्या अस्पष्ट झाल्या आहेत. पण दहशतवादाचे मूळ कोठून सुरू होते आणि प्रदेशात आणि प्रदेशाबाहेरील अनेक कारवायांमध्ये कोणाचा हात आहे, हे जग विसरू शकत नाही, याची खात्री मी तुम्हाला देतो. म्हणूनच कोणत्याही कल्पनेत रमण्यापेक्षा त्यांना स्वतः ही गोष्ट आठवून पाहावी लागेल,’’ असे जयशंकर म्हणाले.

पत्रकाराला सडेतोड उत्तर

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या हजरजबाबीपणाचे दर्शनही पत्रकार परिषदेत झाले. भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून फैलावणाऱ्या दहशतवादाचा सामना दक्षिण आशियाला कधीपर्यंत करावा लागेल’ असा प्रश्‍न चतुराईने एका पाकिस्तानी पत्रकाराने त्यांना विचारला. त्यातील मेख लक्षात घेत ‘तुम्ही निर्माण केलेला दहशतवाद कधी संपेल, हे तुम्ही चुकीच्या मंत्र्याला विचारत आहात. हा प्रश्‍न तुम्ही भारताच्या नाही तर पाकिस्तानच्या मंत्र्यांना विचारायला हवा. जगाचे लक्ष भरकटविण्याचे कितीही प्रयत्न पाकिस्तानने केले तरी जग आता फसणार नाही. कारण दहशतवादाचे मूळ कोठे आहे, हे सर्वांना माहीत आहे, असे सडेतोड उत्तर जयशंकर यांनी दिले.

भोजनात बाजरीचे पदार्थ

पत्रकार परिषदेनंतर जयशंकर यांनी ‘यूएन’चे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस आणि सुरक्षा समितीच्या सदस्यांना दुपारी भोजनाने निमंत्रण दिले होते. भोजनात बाजरीच्या समावेश असलेल्या पदार्थांचा समावेश होता. जगभरात २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्त या विशेष भोजनात बाजरीचा समावेश केला होता. जयशंकर यांनी ट्विट करुन ही माहिती आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आपण २०२३मध्ये आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षा’त प्रवेश करणार आहोत. यामुळे जागतिक खाद्य सुरक्षा आणि कृषी क्षेत्रातील स्थिरता निर्माण होण्‍यास बाजरीचे जास्त उत्पादन, विक्री आणि संवर्धनासाठी संदेश देण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.