Loksabha Confusion : ‘आणीबाणी’ वरून लोकसभेत गदारोळ; काँग्रेस खासदारांची घोषणाबाजी

लोकसभा अध्यक्षांची निवड आणि नवीन मंत्र्यांचा परिचय झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब होण्याची शक्यता होती.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal

नवी दिल्ली - लोकसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने पार पडल्यानंतर बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाज शांततेत पार पडत असताना लोकसभेत नवनियुक्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘आणीबाणी’च्या विरोधात निषेधाचा ठराव मांडला. त्यामुळे लोकसभेत गदारोळ आणि घोषणाबाजी झाली.

लोकसभा अध्यक्षांची निवड आणि नवीन मंत्र्यांचा परिचय झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब होण्याची शक्यता होती. परंतु, आणीबाणी लादल्याच्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निषेध ठराव मांडला. आणीबाणीच्या विरोधात संघर्ष करताना मरण पावलेल्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा ठराव मांडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेच्या आजच्या विषय पत्रिकेत हा विषयच नसताना अध्यक्षांनी स्वतःहून हा प्रस्ताव मांडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सरकारतर्फे लोकसभा अध्यक्ष असा प्रस्ताव मांडू शकत नाही, असे मत व्यक्त केले जात आहे. परंतु हा प्रस्ताव आणीबाणीच्या आंदोलनात मरण पावलेल्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आहे, असा दावा सत्ताधारी पक्षातर्फे करण्यात येत आहे.

काँग्रेसची घोषणाबाजी

हा प्रस्ताव मांडताना ओम बिर्ला म्हणाले, ‘२५ जून १९७५ हा दिवस काळ्या अक्षरांत लिहिला गेला आहे. यानंतर २६ जूनला या निर्णयाला तत्कालीन मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे आज हा प्रस्ताव मांडला’ बिर्ला यांनी आणीबाणीचा निषेध प्रस्ताव मांडल्यानंतर सभागृहात काँग्रेसचे खासदार आक्रमक झाले. ते आसन सोडून घोषणा देऊ लागले. ‘तानाशाही नही चलेगी!’ अशा घोषणा काँग्रेसच्या खासदारांनी दिल्या.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई, के. सी. वेणुगोपाल, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, मनीष तिवारीसह काँग्रेसचे खासदार घोषणा देत आसन सोडून हौद्यापर्यंत आले. यावेळी ‘इंडिया’ आघाडीतील इतर पक्षांचे सदस्य शांत बसले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या गोंधळातच बिर्ला हे आणीबाणीवरील निषेध प्रस्तावाचे वाचन करीत होते.

‘देशावर लादलेल्या आणीबाणीचा निषेध करीत असताना या निर्णयाच्या विरोधात देशभरात आंदोलन करून दुसऱ्यांदा स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा गौरव करणेही आवश्यक आहे. या सर्वांनी लोकशाही टिकविण्यासाठी आपले योगदान दिले आहे. काँग्रेसने राज्यघटनेच्या भावनेला ठेचून १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली होती. हा काळ भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे,’ असे या प्रस्तावात म्हटले आहे.

दोघांकडून ‘ओरिजनल’चे दावे

लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांविरुद्ध आक्रमकपणे लढलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या समर्थकांत आज संसदेत मूळ पक्ष (ओरिजिनल) आपलाच’ या मुद्द्यावरून जुंपल्याचे दिसून आले.

लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची फेरनिवड झाल्यानंतरच्या सर्व पक्षांतर्फे अभिनंदनपर भाषणे झाली. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, सूचकपणे आपलाच पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा उल्लेख केला.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तसेच ओरिजिनल संस्थापक आणि लाडके नेते शरद पवार यांच्यातर्फे अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी तुमचे अभिनंदन’, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी लोकसभाध्यक्षांचे अभिनंदन केले. सोबतच, मागील लोकसभेत विरोधी बाकावरील १५० खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित करताना पुढील पाच वर्षात निलंबनासारख्या कारवाईऐवजी विरोधकांशी संवादातून तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली.

तसेच संसद चालविण्याची जबाबदारी सरकारची असल्याचाही चिमटा सुप्रिया सुळे यांनी काढला. याच मालिकेत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील एकमेव खासदार सुनील तटकरे यांनी मराठी भाषणातून लोकसभाध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजनल’ असा तटकरे यांनी केलेला जाणीवपूर्वक उल्लेख हा सत्ताधारी बाकांवर हशा पिकवून गेला.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजनल या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावतीने अभिनंदन करतो’, असे खासदार तटकरे म्हणाले. ‘ओरिजनल’ शब्दांवर त्यांनी जोर दिल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले, राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच शिवसेनेच्या खासदारांनाही हसू आवरले नाही.

मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदारांकडून शेरेबाजी झाली. तटकरे यांनी १८ वी लोकसभा नवा इतिहास घेऊन आली असल्याचे सांगताना ६२ वर्षांनी पंडित नेहरूंनंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशीही मागणी केली.

राज्यघटनेच्या मूळ सिद्धांताला नख : बिर्ला

ओम बिर्ला म्हणाले, ‘आणीबाणीचा मुख्य उद्देश हा, एका व्यक्तीच्या हातात सर्व शक्ती आणण्याचा होता. त्यामुळे न्यायपालिकेसह राज्यघटनेच्या मूळ सिद्धांताला नख लावण्याचे काम करून नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे हनन या काळात झाले. कुटुंब नियोजन कार्यक्रम, अतिक्रमण हटाओ सारखे कार्यक्रम हे या मनमानी कारभाराचे निदर्शक होते.’ हे भाषण संपल्यानंतर ओम बिर्ला यांनी आणीबाणीच्या विरोधात आंदोलन करताना मरण पावलेल्यांच्या स्मृतीनिमित्त दोन मिनिटे मौन पाळण्याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com