Parliament Session 2024: पहिल्या संसदीय अधिवेशनाची कडवट सांगता

Parliament Session 2024: 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे 4 जून रोजी निकाल लागले. त्यानंतर 24 जून रोजी सुरू झालेल्या पहिल्याच अधिवेशनाची 2 जुलै रोजी अत्यंत कडवट सांगता झाली.
Parliament Session 2024
Parliament Session 2024Sakal
Updated on

Parliament Session 2024: 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे 4 जून रोजी निकाल लागले. त्यानंतर 24 जून रोजी सुरू झालेल्या पहिल्याच अधिवेशनाची 2 जुलै रोजी अत्यंत कडवट सांगता झाली. युद्धाचा विषय सोडल्यास , अन्य कोणत्याही राष्ट्रीय मुद्यावर सत्तारूढ एनडीए व विरोधक इंडिया आघाडी एका व्यासपीठावर येण्याची शक्यता उरलेली नाही. त्यामुळे, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन असो, पुढील अधिवेशने असो, त्या दरम्यान लोकसभा व राज्यसभेच्या पटलांवर दोन्ही बाजूंनी वाक्युद्ध सीमा गाठणार, यात आता शंका उरलेली नाही. त्याचं ट्रेलरच या अधिवेशनात पाहावयास मिळालं.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व रास्वसंघावरील आघात व राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी राहुल गांधी, काँग्रेस व विरोधकांवर केलेला जोरदार प्रत्याघात यांनी अधिवेशन गाजले. मणिपूरबाबत सतत घोषण होऊनही मोदी यांनी मणिपूरच्या समस्या व मुद्याचा भाषणात एकदाही उल्लेख केला नाही, की तेथील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सरकारची काय योजना आहे, हे सांगितले नाही. तेथे झालेल्या उद्रेकांनंतर भाजपला मणिपूरमधील दोन्ही जागा गमवाव्या लागल्या. त्यात काँग्रेसला यश मिळाले.

राहुल गांधी बोलत असताना, दोन वेळी मोदी, दोन वेळी गृहमंत्री अमित शहा, एका वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व संसदीय खात्याचे मंत्री किरण रिज्जीजू यांनी राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे खोडून काढण्यासाठी केलेला हस्तक्षेप व मोदी यांच्या भाषणादरम्यान तब्बल दोन तास विरोधकांनी मणिपूर व अन्य मुद्यांवरून केलेली नारेबाजी यामुळे कटुता शिगेला पोहोचली.

दरम्यान, लोकसभेत सभापती ओम बिर्ला व राज्यसभेत सभाध्यक्ष जगदीप धनकड यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर वारंवार केलेली टीका व दिलेले आदेश, तसेच दोघांच्या भाषणातून मोदी व भाजपवर केलेल्या आरोपांना संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्याची केलेली कृती, यामुळे दोन्ही सभागृहातील पीठासीन नेते पक्षपाती असल्याचा आरोप विरोधक करू लागले आहेत.

आणखी एक कारण म्हणजे, बिर्ला यांनी सभापतीपदी निवड होताच, काही वेळातच इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणिबाणीबाबत जोरदार टीका करणारा अचानक आणलेला व सम्मत करून घेतलेला ठराव, यामुळे वातावरण तापले होते. कढी म्हणजे, राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी अभिभाषणातही आणिबाणीचा केलेला उल्लेख केला. वस्तुतः सभापती व सभाध्यक्ष जेव्हा त्या आसनावर बसतात, तेव्हा ते कोणत्याही पक्षाचे नसतात. तथापि, या ``निव़डणुकांपूर्वी झालेल्या अधिवेशनातही या दोन्ही पाठासीन सभापतींनी मोदी व सत्तारूढ पक्षाची तळी उचलून धरली, व त्याचीच पुनरावृत्ती होत आहे,’’ असा आरोप होत आहे.

भाषण करीत असताना झालेल्या नारेबाजीचा उल्लेख करीत मोदी यांनी सभापतींना त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची विनंती केली. परंतु, गेल्या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या तब्बल दिडशे खासदारांना सभागृहातून निलंबित करण्याच्या बिर्ला यांच्या कारवाईविरूध गेले काही महिने टिका होत असल्याने त्यांनी पहिल्याच अधिवेशनात त्याची पुनरावृत्ती करण्याचे टाळले. शिवाय, विरोधी पक्षांचे आता 233 खासदार आहेत. त्या सर्वांना सभागृहाबाहेर काढण्याचा निर्णय संसदेच्या परंपरेवर काळा ठपका ठरला असता व सभापतींच्या वर्तनावर पक्षपातीपणाचा शिक्का कायम झाला असता, हे ही एक कारण होते. सत्तारूढ व विरोधकांच्या तीव्र मतभेदांकडे पाहता, त्याची पुनरावृत्ती पुढच्या अधिवेशनात होणार नाही, याची खात्री देता येत नाही.

या अधिवेशनात पहिल्या दिवसापासून सत्तारूढ व विरोधकात मतभेद झाले, ते प्रो टेम (अल्पकालीन) सभापतीपदावरून. आठवेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या के. सुरेश यांना ते पद नाकारून, भाजपने ओरिसाचे सात वेळा निवडून आलेले भाजपच्या भर्त्हरी मेहताब यांना ते पद दिले, तेव्हाच काँग्रेसत्याच्या सदस्यांनी त्यांच्या आदेशानुसार सदस्यपदाची शपथ घेण्याचे नाकारले. त्यानंतर झालेल्या सभापतीपदाच्या के सुरेश विरुद्ध या चुरशीत बिर्ला निवडून आले. उपसभापतीपदाचा तिढा मात्र कायम आहे.

भाजपने ते पद सहकारी पक्ष तेलगू देशमला दिले नाही, की जनता दल ( सयुंक्त) ला दिले नाही. संसदीय परंपरेनुसार, उपसभापतीपद हे विरोधी पक्षाला मिळायला हवे. त्या संदर्भात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन ``ते पद समाजवादी पक्षाचे अयोध्येतून निवडून आलेले सदस्य अवधेश प्रसाद यांना देण्यात यावे,’’ असे सुचविले. ते भाजप मान्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळे, हे पद किती महिने अथवा वर्ष रिकामे राहाणार, हे सांगता येत नाही.

गेल्या दहा वर्षात लोकसभेत खऱ्या अर्थाने विरोधीपक्ष नेता नव्हताच. इंडिया आघाडीने त्या पदासाठी राहुल गांधी यांची निवड केल्याने पोकळी भरून निघाली आहे. त्यांची तसेच तृणमूल काँग्रेसच्या सदस्य महुआ मोईत्रा यांना वेगवेगळ्या कारणासाठी डूख धरून लोकसभेची सदस्यता रद्द करण्यात आली होती. ते पुन्हा निवडून आल्याने सत्तारूढ पक्षाच्या अडचणी वाढल्यात.

Parliament Session 2024
Rahul Gandhi Speech : लोकसभेतील भाषणाचे अंश वगळल्याने राहुल गांधी संतप्त! लोकसभाध्यक्षांना पत्र लिहीत व्यक्त केली नाराजी

इच्छा नसताना राहुल गांधी यांना आता कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा द्यावा लागला आहे. ``काँग्रेसला राहुल गांधी यांच्या वयाइतक्याही (54) जागा मिळणार नाही,’’ असे मोदी यांनी प्रचारादरम्यान सांगितले होते. प्रत्यक्षात काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. त्यावरून मोदी यांनी काँग्रेसला बोल सुनावले. ते म्हणाले, की 1984 पासून काँग्रेसला अडिचशे जागांचे ध्येय गाठता आले नाही व आताही ते शंभर जागा मिळवू शकले नाही. ``99 के चक्कर मे फस गये,’’ अशी टीका करीत राहुल गांधी यांचे `बालक’ `बालबुद्धी’ असे वर्णन त्यांनी केले. किस्सा सांगत ते म्हणाले, ``आपल्याला 99 मार्क मिळाले, असे सांगत एक बालक फिरत होता. लोकांना प्रथम वाटले, की त्याला शंभर पैकी 99 मार्क मिळालेत.

परंतु, नंतर लोकांना कळले, की त्याला पाचशे पैकी 99 मार्क मिळाले. तेव्हा त्याचे हसे झाले. इस बालक को कौन समझाए.’’ मोदी यांनी राहुल गांधी यांच्या एकामागून एक फिरक्या घेतल्या व आरोप केला, की सरकारच्या योजनांबाबत खोटा प्रचार करून काँग्रेस देशात अराजकता पसरवू पाहात आहे. ``जनादेश को फर्जी जीत के नशे मे मत बनाव,’’ असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, ``त्यांच्याविरूद्ध (राहुल गांधी) गुन्हे दाखल असून ते जामीनावर मोकळे आहेत,’’ याचीही आठवण करून दिली.

राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणात मोदी व भाजपवर घणाघाती हल्ला केला. ते `पप्पू’ या इमेजमधून बाहेर आल्याचे त्यावेळी दिसले. त्यांच्या भाषणात नेहमी दिसणारा आक्रस्ताळेपणा नव्हता. उलट त्यांनी मणिपूर, नीट परिक्षेत झालेला घोटाळा, अग्निवीर योजनेतील तृटी, बेरोजगारी व त्या संदर्भात त्यांना आलेले अनुभव सभागृहापुढे मांडले. ``हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप देशात भय, द्वेष व हिंसाचार पसरवित आहे,’’ हे त्यांचे वाक्य मोदी व भाजपच्या जिव्हारी लागले. ``नोटबंदीपासून ते सरकारच्या अनेक निर्णयामुळे युवकांवर बेकारीचे संकट कोसळले,’’ असा आरोप त्यांनी केला.

Parliament Session 2024
Manipur violence: "1993 मध्येही असाच हिंसाचार झाला होता, तेल ओतणाऱ्यांनी शांत बसा...."; PM नरेंद्र मोदी मणिपूरवर राज्यसभेत बोलले!

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व सभाध्यक्ष जगदीप धनगड यांच्यात राज्यसभेत जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या. या वादळी अधिवेशनाचे पडसाद अधिवेशनाची सांगता झाल्यावरही देशभर पडत राहाणार आहेत. मोदी यांच्यामते, ``काँग्रेस सरकार विरूद्ध षडयंत्र रचित आहे.’’ त्यांच्या या वाक्याकडे पाहता, येत्या दिवसात मोदी विरोधकांविरूद्ध कोणती कठोर पावले टाकतात, ते पाहावे लागेल व इंडिया आघाडी त्यांचा मुकाबला कसा करतात, हे पाहाणे उद्बोधक ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.