नवी दिल्ली : वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या आज झालेल्या पहिल्याच बैठकीमध्ये आक्रमक विरोधकांमुळे जोरदार खडाजंगी झाली. अल्पसंख्याक मंत्रालयाने आणलेल्या विधेयकावर संसदेमध्ये विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतल्यामुळे हे विधेयक छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील ३१ सदस्यीय समिती नेमली होती. या समितीची पहिलीच बैठक आज संसद भवन परिसरामध्ये झाली.