जगभरात घडलेली प्रत्येक घटना आपल्याला टिव्ही,वृत्तपत्रातून मिळते. पत्रकार रात्रंदिवस मेहनत करून ती माहिती तूमच्यापर्यंत पोहोचवत असतात. त्याच पत्रकारांसाठी जानेवारी महिन्यातील एक दिवस राखून ठेवण्यात आला आहे. तो म्हणजे ६ जानेवारी पत्रकार दिन.
६ जानेवारी रोजी ‘दर्पण’ या पहिल्या साफ्ताहिकाची सुरूवात झाली.याच दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने दर्पनकार बाळशास्त्री जांभेकरांचाही जन्मदिवस आहे. त्यांच्या स्मृतीसाठी हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.
‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे; इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्चविद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होय. 19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधकपर काम केलं.
जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी १८१२ मध्ये कोकणातील पोंभुर्ले या गावात झाला. वडील गंगाधर शास्त्री यांच्या मार्गदर्शनातच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. पुढे मुंबईत येऊन त्यांनी सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ यांच्याकडे इंग्रजी आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे संस्कृतचे धडे घेतले.
जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. त्यांच्या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला.
दर्पणचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.
दर्पणाचा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी प्रकाशित झाला. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे. हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता.
वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. पण, सजाम सुधारण्यासाठी ही एक आयती संधी त्यांना मिळाली होती. वृत्तपत्रात समाजाविरोधात भाष्य करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. पण, दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली. तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता.
दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले.
१८४० मध्येच त्यांनी ‘दिग्दर्शन’ या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र,पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले.
जांभेकरांचे भाषाज्ञान अफाट होते. त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषा तर येतच होत्या. पण, त्याचबरोबर ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या.
रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्र्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्वच वर्गातील वृत्तपत्र आणि मासिकांना बाळशास्त्रींनी एक वाट दाखवली. बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले. बाळशास्त्रींचे अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत निधन झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.