नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत शिक्षण क्षेत्रात भविष्यवेधी धोरण आणि निर्णयांमुळेच भारतीय विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळाले असून भारतीय विद्यापीठाचा लौकिक वाढला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठायचे, असेही मोदी म्हणाले.
दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात पंतप्रधान म्हणाले, की नवीन क्यूएस ग्लोबल रॅकिंगमध्ये २०१४ मध्ये भारतीय विद्यापीठांची संख्या १२ होती आणि ती आता ४५ वर पोचली आहे.
पंतप्रधानांनी यावेळी आयआयटी, आयआयएम, एम्स आणि एनआयटींची संख्या वाढल्याचा उल्लेख करत नव्या देशाच्या उभारणीत त्यांचे योगदान राहील, असे नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले, की पूर्वी एखादा विद्यार्थी संस्थेत प्रवेश घ्यायचा तेव्हा नोकरीला प्राधान्य द्यायचा. प्रवेशाचा अर्थ पदवी मिळवणे आणि पदवीचा अर्थ नोकरी मिळवणे एवढ्यापुरतीच मर्यादित होता. त्यासाठीच शिक्षण घेतले जात होते.
मात्र आजची पिढी अशा पारंपरिक जीवनशैलीत स्वत:ला बांधून ठेवण्यास तयार नाही. ही पिढी नवीन काहीतरी करण्याची इच्छा बाळगून आहे. तरुण स्वत:च स्वत:चे भवितव्य निश्चित करत आहेत.
२०१४ मध्ये भारतात शंभरावर स्टार्टअप होते आणि आज मात्र हीच संख्या लाखांवर पोचली आहे. काही दिवसांपूर्वी आपण अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो. भारताला मिळालेला सन्मान आणि गौरव आपण पाहिला असेल.
कारण जगभरात भारताची क्षमता आणि युवकांवर विश्वास वाढला आहे. शिक्षण क्षेत्रातील भविष्यवेधी धोरणांमुळे भारतीय विद्यापीठांना जागतिक ओळख मिळत आहे.
भारत आणि अमेरिका कराराचा उल्लेख करताना ते म्हणाले, की भारतीय तरुणांना पृथ्वीपासून अवकाश, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार आहे. आवाक्याबाहेर वाटणारे तंत्रज्ञान आता भारतीय तरुणांना मिळेल.
त्यामुळे त्यांच्या कौशल्याला चालना मिळेल. मायक्रॉन आणि गुगलसारख्या कंपन्या देशात मोठी गुंतवणूक करणार आहेत आणि ते बदलत्या भारताचे चिन्ह आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
अचानक मेट्रो प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेट्रोतून प्रवास करत दिल्ली विद्यापीठात पोचले. सकाळी ११ वाजता लोक कल्याण मार्ग मेट्रो स्थानकावर पोचले.
तेथून त्यांनी तिकीट काउंटरवरून टोकन घेतले आणि त्यानंतर प्लॅटफॉर्मवर पोचले. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांबरोबर चर्चा देखील केली. दिल्ली विद्यापीठाची स्थापना १९२२ रोजी झाली. यात ८६ विभाग, ९० महाविद्यालय आणि ६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी अध्यापन करत आहेत.
शिक्षण केवळ शिकण्यासाठीच नाही तर शिकवण्याची प्रक्रिया आहे. सर्वांच्या प्रयत्नांतून नवीन शिक्षण धोरण तयार झाले आहे. विद्यार्थी हे आपल्या इच्छेनुसार विषयाची निवड करु शकतील. शंभर वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळवणे हे आपले पहिले ध्येय होते. आता आपल्यासमोर २०४७ पर्यंत विकसित भारत निर्मितीचे ध्येय आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.