पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशवासियांशी संवांद साधला. २०२२ या नव्या वर्षातील ही मोदींची पहिलीच मन की बात होती.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशवासियांशी संवांद साधला. २०२२ या नव्या वर्षातील ही मोदींची पहिलीच मन की बात होती. महात्मा गांधींजींच्या पुण्यतिथीनिमित्त बोलताना मोदींनी म्हटलं की, आजचा दिवस गांधीजींची शिकवण आठवण्याचा आहे. आज आपल्या पूज्य बापूंची पुण्यतिथी आहे. ३० जानेवारीचा हा दिवस आपल्याला त्यांच्या शिकवणीची आठवण करून देतो. काहीच दिवसांपूर्वी आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. दिल्लीत राजपथावर आपण देशाच्या शौर्याचा आणि सामार्थ्याच्या चित्ररथांचे संचालन पाहिले. यामुळे सर्वांची मान अभिमानाने उंचावली आहे आणि उत्साह संचारला आहे.
इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. याचं देशवासियांना ज्या पद्धतीने स्वागत केलं ते विसरू शकत नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशात या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय प्रतिकांची पुन्हा प्रतिष्ठापना केली जात असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.
इंडिया गेटजवळ असलेली अमर जवान ज्योती आणि तिथून जवळ असणारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात असलेली ज्योती दोन्ही एकत्र करण्यात आल्या. या भावूक क्षणी अनेक देशवासय आणि शहीद कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते असं मोदी मन की बात कार्यक्रमात म्हणाले.
देशभरातील एक कोटीहून अधिक मुलांनी त्यांची मन की बात पोस्ट कार्डमधून पाठवली असल्याचं मोदींनी सांगितलं. ते म्हणाले की, ही पोस्ट कार्ड देशासह परदेशातून मिळाली आहेत. या पोस्ट कार्डमध्ये देशातील तरुणांचे मोठे ध्येय दिसते. ऋद्धिमा नावाच्या मुलीने दहशतवादमुक्त आणि सशक्त भारत बघायचाय असं पोस्ट कार्डमध्ये म्हटल्याचं मोदींनी सांगितलं.
देशात नुकतीच पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांमध्ये अशी अनेक नावे आहेत ज्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. हे लोक आपल्या देशाचे 'अनसंग हिरो' असून त्यांनी कठीण परिस्थितीत असमान्य असं काम केलं आहे असंही मोदी म्हणाले.
मध्य प्रदेशातील पेंच टायगर रिझर्व्हमधील कॉलरवाली वाघिणीच्या मृत्यूवर लोक किती भावूक झाले हेसुद्धा मोदींनी सांगितलं. तसंच राष्ट्रपतींच्या बॉडीगार्डच्या ताफ्यातील विराट घोडा निवृत्त झाला त्याच्या निरोपावेळचा प्रसंगही मोदींनी मन की बातमधून सांगितला.
कोरोनाच्या नव्या लाटेचा भारत सामना करत आहे. या लाटेविरोधात भारत यशस्वीपणे लढा देत आहे. ही अभिमानाची गोष्ट असून जवळपास साडे चार कोटी मुलांनी कोरोनाची लस घेतली असल्याचंही मोदींनी सांगितलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.