Pratibhatai Patil: महाराष्ट्राला शूरवीरांची मोठी परंपरा लाभली आहे. शौर्याच्या बाबतीत मराठी महिला देखील कधी मागे राहिलेल्या नाहीत. स्वराज्यजननी जिजामातांच्या पासून ते थेट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पर्यंत अनेक महिलांनी राज्यशकट चालवलाच शिवाय युद्धकाळात डावपेच बनवण्यात देखील त्यांनी आपली हातोटी दाखवली. हीच परंपरा आजच्या मराठी माताभगिनी चालवत आहेत.
याच परंपरेमध्ये शिरपेच खोवला तो भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी. त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर होत्याच मात्र राष्ट्रपतीपदाच्या अधिकारांबरोबरच त्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सरसेनापती बनल्या.
जळगावच्या ग्रामीण भागात बालपण गेलेल्या प्रतिभाताई पाटील यांना लहानपणापासूनच देशप्रेमाची आवड होती. १९६२ साली चीनचे आक्रमण झाले. सारा देश या आक्रमणामुळे हादरला. प्रसंगाचे गांभीर्य जाणून प्रतिभाताईंनी आपल्या मतदारसंघाचा झंझावाती दौरा करून जखमी सैनिकांच्यासाठी कल्याण निधी मोठ्या प्रमाणात जमा करण्यासाठी भावनात्मक आवाहन केले. त्याकाळात त्या तरुण आमदार होत्या. त्यांच्या या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. काही स्त्रीयांनी आपले दागदागिने या राष्ट्रकार्यासाठी दिले.
प्रतिभाताईंंनी संरक्षण सेवांना हातभार लावण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये ‘जिल्हा महिला गृहरक्षक दल’ स्थापन केले. या संदर्भात आवश्यक असलेल्या सर्व चाचण्यांत त्या उत्तीर्ण झाल्या. त्या या गृहरक्षक दलाच्या कमांडरपदी नियुक्तही झाल्या. ३०३ बंदुकीच्या व निशाणेबाजीच्या झालेल्या स्पर्धेत त्यांना दुसरा क्रमांक मिळाला. त्यांना भारतीय सैन्यदलाबाबत प्रचंड आस्था होती आणि सैन्यदलासंबंधी असलेल्या आदराचे प्रतीक म्हणून त्यांनी या सरसेनापतीपदाची सूत्रे राष्ट्रपतीपदी असताना घेतली.
सैन्य दलाच्या छावणींना भेटी
आपल्या कार्यकिर्दीत त्यांनी अतिदुर्गम असणा-या सैनिकी छावण्यांना भेट देऊन आपल्या सैन्याचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. जम्मु-काश्मिरच्या दूरवरच्या सीमाभागात जाऊन सैनिकांची भेट घेतली. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशातील इंडो-तिबेटन-बॉर्डर–पोलिसांशीही त्यानी संवाद साधला. हवाईदल आणि नौदल ( विमानवाहू युद्ध नौका विक्रांत ) तळांनाही त्यांनी भेटी दिल्या.
सुखोई ३० या फायटर विमानातून उड्डाणाचा अनुभव
भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० या लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव जी. आय सूट घालून २५ नोव्हेंबर २००९ रोजी घेतला. या लढाऊ विमानातील त्यांचा प्रवास हा ज्या महिलांना अशा धाडसी लढाऊ दलात काम करण्याची इच्छा आहे अशा महिलांसाठी प्रेरणादायक आणि स्फूर्ती देणारा अनुभव होता. तसेच आपल्या जवानांचे नीतीधैर्य वाढविण्यासाठी सुद्धा होता. रशियाचे अध्यक्ष दिमिगी मिदवेदेव्ह यांनी प्रतिभाताईंच्या धाडसी कार्याबद्दल फोन करून त्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.