President Draupadi Murmu on AI: ‘‘तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य सुविधा जनतेला सहजरित्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या क्षेत्रात नव्या वाटा शोधण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)सारख्या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी अग्रणी भूमिका बजावली पाहिजे,’’ असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवी सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस होते. अमृत महोत्सवी सोहळ्याचे स्वागताध्यक्ष उपमुख्यमंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये हेही यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, की पंतप्रधान जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल माध्यमातून नोंदवण्यात येत आहेत, ही केंद्र शासनाची कामगिरी कौतुकास्पद आहे. १९४७ मध्ये स्थापन झालेल्या नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देणारे डॉक्टर तयार झाले आहेत. ही ‘मेडिकल’ची जमेची बाजू आहे.
आरोग्याच्या क्षेत्रात आजही असमानता दिसून येत असल्याची भावना व्यक्त करीत यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने विमा आरोग्य योजना सुरु केली आहे. या योजनांचा मोठा आधार गरिबांना मिळाला आहे असे त्या म्हणाल्या. यावेळी माजी विद्यार्थिनी डॉ. शकुंतला गोखले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेल्या अत्याधुनिक लेक्चर हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते झाले.(Latest Marathi News)
‘एएफएमसी’च्या शिरपेचात ‘राष्ट्रपती का निशान’
पुणे : भारतीय सैन्याच्या तुकडीला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ‘राष्ट्रपती का निशान’ (राष्ट्रपतींचे मानचिन्ह) पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) प्राप्त झाला आहे. ‘एएफएमसी’च्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुक्रवारी (ता. १) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन्मान प्रदान केला. ‘एएफएमसी’च्या कॅप्टन देवाशिष शर्मा कीर्ती चक्र परेड मैदानावर सन्मान सोहळा झाला. सशस्त्र दलातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धर्मगुरूंनी निशानाचा अभिषेक केला.
त्यानंतर मुर्मू यांनी ‘एएफएमसी’ला राष्ट्रपतींचे मानचिन्ह प्रदान केले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष चिन्ह आणि स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘प्रज्ञा’ या कॉम्प्युटेशनल मेडिसिनवर आधारित प्रणालीचेही उद्घाटन करण्यात आले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.