गुरुवारचा सूर्योदय हा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) वाटचालीत एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. पहाटेच्या गुलाबी थंडीत बिगूल वाजल्यानंतर ‘एनडीए’तील ‘क्वाटर डेक’चा दरवाजा उघडला अन् विविध सुरावटींच्या तालावर संचलन करत खेत्रपाल मैदानावर लष्करी बँडचे आगमन झाले.
त्यापाठोपाठ सुरू झालेल्या छात्रांच्या शिस्तबद्ध संचलनाने एका ऐतिहासिक घटनेची नोंद केली. ‘एनडीए’च्या ७५ वर्षांच्या वाटचालीत प्रथमच मुलींची बटालियन दीक्षान्त संचलनात सहभाग झाली. ज्याची दखल खुद्द राष्ट्रपतींनी घेत, ही घटना ऐतिहासिक असल्याचे जाहीर केले.
मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आगमनानंतर राज्यपाल रमेश बैस यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर रुबाबदार घोड्यांच्या शानदार बग्गीमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे खेत्रपाल मैदानावर आगमन झाले.
छात्रांची मानवंदना स्वीकारत त्यांनी लष्करी वाहनातून संचलनाची पाहणी केली. यानंतर पदवी प्राप्त केलेल्या आणि दुसऱ्या वर्षातील कॅडेटनी दिमाखदार संचलन करत प्रशिक्षणातील उत्तुंग कामगिरी दाखवून दिली. त्यात १५ महिला छात्रांच्या संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अखेर तीन वर्षे प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत जल्लोष केला. चेतक हेलिकॉप्टर, जॅग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दिलेली सलामी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
समारंभाला सरसेनाध्यक्ष अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह, एनडीए कमांडंट व्हॉइस ॲडमिरल अजय कोचर, चीफ इन्स्ट्रक्टर संजीव डोग्रा उपस्थित होते. १४५व्या तुकडीत एकूण ३५३ छात्रांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले.
महिलांना आजही त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी खेद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘‘यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणारे छात्र पाहून मला आनंद होत आहे.
‘एनडीए’त सन २०२२ पासून महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. आज प्रथमच संचलनात मुली सहभागी झाल्या, ही ऐतिहासिक बाब आहे. महिला छात्रांना प्रशिक्षणातील अनुभव पुढील करिअरमध्ये उपयोगी पडेल. बदलत्या युगानुसार नवीन युद्धनीती आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणारे कॅडेट प्रथम सिंग यास सुवर्णपदक, कॅडेट जतिन कुमार यास रौप्यपदक आणि कॅडेट हर्षवर्धन भोसले यास ब्राँझपदक देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ सन्मान ज्युलियन स्क्वाड्रन हेमंत कुमार यांनी स्वीकारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.