जुलैत राष्ट्रपतिपदाची निवडणूक : काँग्रेसेतर उमेदवाराबाबत सप, तृणमूल आग्रही

चिंतन शिबिरानंतर काँग्रेसचा निर्णय शक्य
Presidential election in July Congress Trinamool congress bjp new delhi
Presidential election in July Congress Trinamool congress bjp new delhisakal
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या जुलैत होणाऱ्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार देण्याचा प्रयत्न असला तरी या मुद्द्यावर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्षाने काँग्रेसवर दबाव आणणे सुरू केले आहे. राष्ट्रपतिपदासाठी काँग्रेसेतर पक्षांचा उमेदवार असावा आणि काँग्रेसने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यावा, यासाठी तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आग्रही असल्याचे समजते. त्यापार्श्वभूमीवर चिंतन शिबिरानंतर काँग्रेस पक्ष या उमेदवारीबाबत निर्णय करेल, असे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीतील विजयामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांचे गणित भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी अनुकूल बनले आहे. तरीही बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला अन्य पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये संयुक्त उमेदवार दिल्यास सत्ताधाऱ्यांना टक्कर देता येईल असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. मात्र, हा संयुक्त उमेदवार कोणत्या पक्षाचा असावा यावर विरोधकांत एकमत झालेले नाही.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेससारख्या एनडीएच्या बाहेरील आणि यूपीएच्या बाहेरील पक्षांची मते निर्णायक ठरणारी आहेत. परंतु, या पक्षांचा राजकीय संघर्ष भाजप आणि काँग्रेसशी राहिला असल्याने विरोधकांचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरविताना, या प्रादेशिक पक्षांना आकर्षित करू शकेल असाच चेहरा दिला जावा, असा सूर विरोधी पक्षांच्या गोटातून पुढे आला आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते.

काँग्रेसने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार पुढे केल्यास प्रादेशिक पक्षांची भूमिका वेगळी असू शकते हे लक्षात घेऊन अन्य पक्षांच्या उमेदवाराचा विचार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी केला जावा. त्यानंतर कॉग्रेसने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार द्यावा, काँग्रेस, असे तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे म्हणणे असल्याचे समजते. या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी, कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या तेलंगण दौऱ्याचा दाखला दिला. तेलंगणातील सभेत राहुल गांधींनी सत्ताधारी टीआरएसवर कडाडून टीका केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला हा पक्ष सहजासहजी पाठिंबा देणार नाही. याच मालिकेत, ‘आप’चेही उदाहरण त्यांनी दिले. काँग्रेसने विरोधकांच्या संभाव्य एकजुटीमध्ये ‘आप’ला दूरच ठेवले आहे. त्यामुळे या पक्षाची भूमिका काँग्रेस उमेदवाराबाबत अनुकूल राहीलच याची खात्री नाही असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

भाजपकडून तयारीला वेग

कॉंग्रेसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चिंतन शिबिरावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या निमित्ताने चिंतन शिबिरामध्ये हा मुद्दा पुढे येऊ शकतो. जूनमध्ये यूपीएची बैठकही होऊ शकते. भाजपनेही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तयारीला वेग दिला आहे. संयुक्त जनता दलाची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेतृत्वाने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नितीश कुमार यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठविले. त्याचप्रमाणे बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस या पक्षांनाही भाजपने चुचकारणे सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.