बारसात (प. बंगाल) : ‘‘संदेशखाली गावातील लैंगिक शोषण आणि हिंसाचाराची घटना देशाची मान खाली घालायला लावणारी आहे. तृणमूल काँग्रेसने गुन्हेगारांना पाठिशी घालून अक्षम्य गुन्हा केला आहे,’’ अशी घणाघाती टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी संदेशखाली येथील पीडित महिलांची भेट घेतली. त्यानंतर बारसात येथे ‘नारीशक्ती वंदन’ सभेत ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी यांनी बारसात येथे ३८ मिनिट भाषण केले. भाषणात त्यांनी ‘इंडिया‘ आघाडी, पश्चिम बंगाल सरकार, संदेशखाली आणि केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘इंडिया’ आघाडीचे काही भ्रष्टाचारी लोक माझ्या कुटुंबीयांबाबत विचारत आहेत. ते म्हणताहेत, मोदी यांना स्वत:चे कुटुंब नाही, म्हणून ते घराणेशाहीविरुद्ध बोलतात. पण मी त्यांना सांगू इच्छितो, देशातील भगिनी मोठ्या संख्येने माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि हेच मोदी यांचे कुटुंब आहे. या माता भगिनी सुरक्षा कवच होऊन मोदींचे संरक्षण करतात. प्रत्येक नागरिक स्वत:ला मोदी कुटुंबातील समजत आहे. प्रत्येक शेतकरी, तरुण, भगिनी, कन्या याही आपण मोदींच्या कुटुंबातील असल्याचे सांगत आहेत. हे घराणेशाहीचा पुरस्कार करणाऱ्यांनी पाहिले पाहिजे.’’
ममता बॅनर्जी सरकारवर टीका करताना त्यांनी, पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजना राबविल्या जात नसल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. महिला सुरक्षा, बेटी बचाओ-बेटी बढाओ, उज्ज्वला गॅस योजना, अनुदानित गॅस सिलिंडर योजना बंगालमध्ये लागू केलेल्या नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले.
भाषणात त्यांनी संदेशखालीचा मुद्दा काढला. बंगालच्या सरकारला आपल्या दु:ख, वेदनेने काहीही फरक पडत नाही. तृणमूल काँग्रेसचे सरकार अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. संदेशखालीत गरीब आदिवासी भगिनींवर अत्याचार झाले आहेत. बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे माफिया राज मोडून काढण्यासाठी बंगालची तमाम महिला शक्ती सरसावली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘कंदिला’मुळे एकच कुटुंब उजळले: मोदी
बेतिया (बिहार): ‘इंडिया’ आघाडी लालटेन (कंदिल)च्या भरवशावर आहे. परंतु या कंदिलामुळे केवळ एकच कुटुंबाचे आयुष्य उजळले आहे. मोदी खरे बोलतात तेव्हा घराणेशाहीचा मुद्दा मांडतात. त्यांना लूटमार करण्याचा परवाना हवा आहे, असा आरोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. बेतिया येथे आयोजित सभेत बोलताना ते म्हणाले, बेतियाच्या शेतकऱ्यांना ८०० कोटी रुपये मिळाले आहेत. लालटेनने आपल्याला काय दिले? असा सवाल त्यांनी केला. आपण लहानपणी घर सोडले होते. दिवाळी, होळीला लोक घरी जातात, परंतु मला परतण्यासाठी घर नव्हते. संपूर्ण देश माझे कुटुंब होते. आज संपूर्ण देश म्हणतोय की मी मोदी कुटुंबातील आहे. दरम्यान, आज मोदी यांच्या हस्ते गंगा नदीवरच्या सहा पदरी पुलाचे भूमिपूजन झाले. यात २२ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
‘अंडर वॉटर मेट्रो’ चे मोदींकडून लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकता येथे देशाची पहिली पाण्याखालून जाणाऱ्या मेट्रो बोगदा प्रकल्पांसह १५ हजार ४०० कोटी योजनांचे उद््घाटन केले. ही मेट्रो जमिनीपासून ३३ मीटर खाली आणि हुगळी नदीच्या तळापासून १३ मीटर खाली तयार केलेल्या भुयारी मार्गावरून धावणार आहे. १९८४ रोजी देशातील पहिली मेट्रो रेल्वे कोलकता येथे उत्तर दक्षिण कॉरिडॉर (ब्लू लाइन) मध्ये धावली होती. ४० वर्षांनंतर पुन्हा देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो रेल्वे धावणार आहे. हावडा ते कोलकता यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. दररोज सात ते दहा लाख लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
पीडित महिलांची भेट
पश्चिम बंगालच्या सरचिटणीस अग्निमित्रा पॉल यांनी संदेशखालीच्या महिलांनी पंतप्रधानांशी घेतलेल्या भेटीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, संदेशखालीच्या पीडित महिलांनी अत्याचाराचे कथन केले. यावेळी पंतप्रधानांनी पीडित महिलांना धीर देत, आम्ही आपली काळजी घेऊ, अशी हमी दिली.
पश्चिम बंगालला तृणमूल काँग्रेस नावाचे ग्रहण लागले असून तो राज्याचा विकासाचा गाडा पुढे नेण्यास आडकाठी आणत आहे. आपल्याला विरोधकांची ‘इंडिया‘ आघाडीला पराभूत करायचे आहे. भारताला विकसित देश करण्यासाठी महिला शक्तीला अधिकाधिक संधी देणे गरजेचे आहे. भाजप सरकारने प्रत्येक क्षेत्रात महिलांसाठी नवीन मार्ग खुला केला आहे. ‘इंडिया’ आघाडीचे सरकार असलेल्या राज्यांत महिलांवर अत्याचार होत आहेत.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान