Priyanka Gandhi : प्रियांका गांधी रिंगणामध्ये;वायनाडमधून लढणार;राहुल रायबरेलीतच

लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर जिंकलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Priyanka Gandhi
Priyanka Gandhisakal
Updated on

नवी दिल्ली/वायनाड : लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर जिंकलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रियांका गांधी-वद्रा यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. यामुळे प्रियांका या प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) वायनाड सोडण्याच्या राहुल यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आधीच दक्षिणेऐवजी उत्तरेतून लढायला हवे होते, असे ‘माकप’ने म्हटले आहे. मुस्लिम लीगने मात्र प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आज उच्चस्तरीय बैठक झाली.

या वेळी काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी व सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांच्या आत दोन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागतो. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये अमेठीबरोबरच केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढविली होती. अमेठीत त्यांचा पराभव झाला असला तरी वायनाडच्या मतदारांनी त्यांना लोकसभेत पाठविले होते. त्यामुळे अमेठी आणि रायबरेलीबरोबर वायनाड मतदारसंघाबरोबरही गांधी कुटुंबाचे नाते जोडले गेले.

यंदाच्या निवडणुकीत राहुल यांनी वायनाडबरोबरच सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. दोन्हीकडे त्यांचा विजय झाला होता. आता ते वायनाडमधून राजीनामा देणार असून त्यांच्याऐवजी प्रियांका गांधी यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार असल्याचे काँग्रेसने आज जाहीर केले.

वायनाडशी नाते कायम

आपल्या भावना व्यक्त करताना राहुल गांधी म्हणाले,‘‘मागील पाच वर्षांपासून वायनाडची जनता माझ्या कुटुंबाला साथ देत आहे. यापुढेही त्यांनी साथ द्यावी, अशी मी विनंती करतो.’’ प्रियांका गांधी यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढविली नसून राजकीय जीवनातील ही त्यांची पहिलीच निवडणूक ठरणार आहे. तरीही, त्यांना राहुल यांच्यापेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्‍वास केरळमधील काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. प्रियांका गांधी यांनीही, वायनाडमधून राजकीय जीवनाची सुरुवात करताना आनंद होत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रायबरेली व अमेठीतील जनतेशी असलेला ऋणानुबंध कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाल्यास वायनाडमध्ये गांधी कुटुंबाचे अस्तित्व कायम राहणार आहे.

या निर्णयाचा मला आनंदच झाला आहे. वायनाडचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. एक चांगला प्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न मी करेन. रायबरेलीशी माझे जुने नाते असून या मतदारसंघाप्रमाणेच मी अमेठीसाठीदेखील खूप काम केले आहे. मी रायबरेलीमध्येसुद्धा भैयाला मदत करेन. आम्ही दोघे वायनाड आणि रायबरेलीसाठी परस्परांना मदत करू.

- प्रियांका गांधी-वद्रा, काँग्रेसच्या सरचिटणीस

रायबरेली आणि वायनाडमधील जनतेशी माझा भावनिक ऋणानुबंध आहे. मागील पाच वर्षांत संसद सदस्य या नात्याने खूप चांगला अनुभव आला. वायनाडच्या जनतेने ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहत खूप प्रेम दिले. कठीण काळात लढण्यासाठी ऊर्जा दिली; हे मी कधीही विसरू शकत नाही.

- राहुल गांधी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते

दोन मतदारसंघांतून लढणार असल्याचे राहुल गांधी यांनी आधीच जाहीर करायला हवे होते. त्यांनी वायनाडमधील जनतेला फसविले आहे. आमचा संसदीय लोकशाहीवर विश्‍वास असल्याने आमचा उमेदवार लवकरच जाहीर करू.

- ॲनी राजा, भाकप नेत्या

रायबरेली याआधीपासूनच राहुल यांच्या जवळ राहिलेली आहे. गांधी कुटुंबाचे या मतदारसंघाशी जवळचे नाते राहिले असून अनेक पिढ्यांपासून त्यांचे घराणे येथून निवडणूक लढत आहे. राहुल यांनी रायबरेलीचे प्रतिनिधित्व करावे म्हणून स्थानिक जनता आणि कार्यकर्ते आग्रही होते. वायनाडच्या जनतेलाही राहुल हवे आहेत पण कायद्याने त्यांना बंधने येत असल्याने येथून आता प्रियांका निवडणूक लढतील.

- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.