वायनाड: केरळमध्ये लोकसभा मतदारसंघात बाहेरच्या उमेदवाराला निवडून देण्याची परंपरा असून यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाड मतदारसंघातील मतदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विजयी केले होते. राहुल गांधी यांनी दोन मतदारसंघांत विजय मिळविल्याने त्यांना वायनाडच्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे, वायनाडमध्ये येत्या १३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत असून राहुल गांधी यांच्या भगिनी व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी ती लढवीत आहेत. बाहेरच्या उमेदवाराला निवडून देण्याची परंपरा वायनाड यंदाही राखणार का, याची उत्कंठा आहे.