सचिनच्या बॅटने मोदींचा षटकार; #IndiaAgainstPropaganda मागेही प्रोपगंडाच!

Propaganda
Propaganda
Updated on

प्रोपगंडा ही गोष्ट मुख्यत: सत्ताधारी लोकांकडून राबवली गेल्याचा आजवरचा इतिहास आहे, मग ती व्यवस्था कसलीही असो. लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांचे आवाज जितके मजबूत तितकी लोकशाही सकस, असं म्हटलं जातं. कोणत्याही सत्तेला आपल्याविरोधात कुणी बोलावं, हे अर्थातच रुचणारं नसतंच. सगळे आवाज आपल्या समर्थनातले असावेत. सगळ्यांनी सत्तेचं एकसुरी गुणगाण गावं, अशी अपेक्षा असते. मात्र, हे होण्यासाठी डोळे उघडे असले, तरीही जनता एका स्वांतसुखाय निद्रेत असावी लागते. त्यासाठी तिला भुलवावं लागतं. आणि या भुलवण्याची मोहिम अविरत असावी लागते. आणि ही मोहिम म्हणजेच प्रोपगंडा. जनतेला भुलवणे हेच प्रोपगंडाचे कार्य असल्याने त्यात भ्रामकता अधिक असणे हेच अभिप्रेत आहे. 

मोघम घोषणा
'India Against Propaganda' या विधानात चुकीचं काय आहे? काहीच तर नाही. कुणी #IndiaTogether असं म्हणत असेल तर कुणाच्याही पोटात दुखण्याचं तसं काहीच कारण नाही. मात्र, India Against Propaganda ही घोषणा फारच मोघम आहे. ती यासाठी मोघम आहे कारण, काही मोहीमांमधल्या घोषणा या मोघम असाव्या लागतात. ती गरजच असते. त्या मोघणपणामुळेच प्रत्येकाच्या मनात त्याच्या-त्याच्या बौद्धिक कुवतीनुसार हवा तोच, परंतु चांगलाच अर्थ निर्माण होणार असतो. 

प्रोपगंडामधील एक तंत्र
'प्रोपगंडा विरोधातील भारत' वा 'एकजूट भारत' या घोषणेमध्ये एकप्रकारची 'ग्लिटरिंग जनरॅलिटी' आहे. 'ग्लिटरिंग जनरॅलिटी' अर्थात 'चमकदार सामान्यता' हेच मुळात एक प्रोपगंडामधील महत्वाचं तत्व आहे. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीस वा गोष्टीस एखाद्या आदर्श नैतिकतादर्शक शब्दाशी जोडून द्यायचे आणि त्यातून कसल्याही पुराव्याविना ती बाब कशी बरोबर आहे, हे लोकांना मान्य करायला आणि त्यांच्या गळी उतरायला भाग पाडायचे, असे हे प्रोपगंडामधीलच एक सुप्रसिद्ध तंत्र. 
क्रिकेटचा देव आणि भारतरत्न मिळालेला व्यक्ती आणि त्यामागोमाग देशातील एन्फ्लुएन्सर लोकांची मांदियाळी जेंव्हा एकापाठोपठा एक याप्रकारे 'त्या' मोघम घोषणेखाली ट्विट करत सुटते, तेंव्हा त्यांना हीच 'चमक' गडद करायची असते. यामुळे, एक गोष्ट पक्की होते. ती म्हणजे ज्या बाबीसंदर्भात ही घोषणा आहे, त्याबद्दल काहीही वेगळं मत मांडणं हेच अवघड होऊन बसतं.

रिहाना-ग्रेटा यांचं कुठं चुकलं?
इंडिया अगेन्स्ट प्रोपगंडा ही शेतकरी आंदोलनासंदर्भातील मोघम घोषणा होती. त्यामुळे इथं तुम्ही शेतकरी आंदोलनाबाबत इतर काहीही वेगळी भूमिका घेणं, सरकारची काहीही चूक काढणे अथवा रिहाना-ग्रेटा यांचं कुठं चुकलं? असं म्हणणं देखील तुम्ही त्या मोघम घोषणेतील 'टूगेदर इंडिया'च्या विरोधातच आहात, अशी छटा तुमच्याभोवती आपोआप बनवणारं ठरतं. अथवा प्रोपगंडा पसरवणारे लोक, ते तुम्हीच! अशीच तुमची आपसूकच प्रतिमा बनते. कारण तुम्ही 'सामान्यता' पावलेल्या चमकेविरोधात अथवा त्याव्यतिरिक्त भूमिका घेऊन चमकायला पाहत आहात. हा आपल्याला प्रोपंगडा आहे, असं वाटलंही नसेल कारण, प्रोपगंडाचा पहिला नियम हा आहे की तो प्रोपगंडा वाटता कामा नये. 


तेंव्हा देशाची बदनामी होत नाही?
गेले 70 दिवस शेतकरी ऐन थंडीत आणि अवकाळी पावसात आंदोलन करताहेत. त्यावेळी या कथित 'पालखीचे भोई'नी साधा ब्र काढला नाही. पण आज या सेलिब्रिटींनी राष्ट्रवादाचं पांघरून ओढून घेतलं. खरं तर आताच्या परिस्थितीला जबाबदार सरकार आहे. हे कायदे लोकशाही मूल्यांमध्ये अभिप्रेत असणाऱ्या चर्चेच्या, बहुमताच्या मार्गाने आणलेच गेलेले नाहीयत. उलटपक्षी वीज-पाणी-इंटरनेट सुविधा बंद करून मोठमोठे खिळे जर ठोकले गेले असतील तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची चर्चा होणारच. 70 दिवस शेतकरी आंदोलन करत असताना ते क्रूरपणे चिरडून टाकताना देशाची बदनामी होत नाही मात्र, कुणी 'त्याबद्दल चर्चा का होत नाहीय?' असा सवाल करत असेल तर ती बदनामी कशी होऊ शकते? विरोधकांची मागणी असूनही सरकार यावर संसदेत बोलायला तयार नाहीय. मग लोक बोलणार कुठे?

विरोधकांची एकसाची काळी प्रतिमा
प्रोपगंडाचे कामच मुळी लोकांसमोर तथ्ये अथवा माहिती ठेवणे असे नसून, ती माहिती अशाप्रकारे ठेवणे ज्यातून आपल्याला हवी तशी लोकधारणा निर्माण करता येईल. ज्यामुळे लोक नेहमी आपल्या समर्थनार्थ राहतील आणि ते कधीच आपल्या विरोधात आवाज उठवणार नाहीत. आणि जे आवाज उठवतात, जे आपल्याला विरोध करतात त्यांच्याही बंदोबस्त प्रोपगंडाद्वारे करण्यात येतो. यातीलच प्रोपगंडाचे सर्वांत महत्त्वाचे तंत्र आहे ते म्हणजे आपल्या शत्रू किंवा विरोधकांना काळ्या रंगात रंगवणे, त्यांची एकसाची अशी प्रतिमा तयार करणे आणि त्यांना बदनाम करणे. मग त्यांना देशद्रोही ठरवणं असेल, त्यांना देशविरोधी म्हणणं असेल, त्यांची खिल्ली उडवणं असेल या आणि अनेक गोष्टी यामध्ये येतात. 
या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरळ सरळ देशद्रोही म्हटलं जातंय. भारतात 2014 आधी निर्भया आंदोलन, लोकपाल आंदोलन अशी देशव्यापी अनेक आंदोलने झाली. यात कुणीही आंदोलकांना आणि सरकार विरोधकांना देशद्रोही ठरवल्याचं ऐकिवात नव्हतं. मात्र, 2014 नंतर झालेली विद्यार्थ्यांची, CAA विरोधातील, काश्मीरबाबतची आणि आता कृषी कायद्याबाबतची सगळी आंदोलने याच प्रकारे बदनाम केली गेलेली स्पष्टपणे दिसून येतील. या सगळ्यातच 'तुकडे-तुकडे गॅंग'चा हात असल्याचे वारंवार बोललं गेलं. ते निव्वळ सरकार समर्थकांकडून नव्हे तर प्रत्यक्षात सरकारमधील मंत्र्यांकडून देखील वापरलेली ही भाषा आपण सर्रास पाहिलेली असेल. कारण, प्रोपगंडात महत्वाची गोष्ट असते विरोधात उठणाऱ्या आवाजांची एकसाची आणि काळ्या रंगातील प्रतिमा तयार करणं.

लोकभावना सरकारच्या बाजूनेच
समाजात सर्वांत महत्त्वाची गोष्ट काय असते तर ती लोकभावना. लोकभावनेची साथ असेल तर कोणतीही गोष्ट अपयशी ठरू शकत नाही. आणि साथ नसेल तर कोणतीही गोष्ट यशस्वी ठरु शकत नाही. त्यामुळे कायदे करणाऱ्या अथवा निर्णय घेणाऱ्या व्यक्तींपेक्षा जो लोकभावनेला आकार देऊ शकतो. तोच लोकांमध्ये अधिक खोलवर पोहोचू शकतो. कायदे आणि नियमांची कशी आणि कशाप्रकारे अंमलबजावणी करायची हे देखील त्यांच्याच हातात असतं. त्यामुळे लोकभावना सतत आपल्याबाजूने ठेवण्याचं काम प्रोपगंडाद्वारे करण्यात येतं. या सरकारचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. नोटबंदी असो, GST असो या निर्णयांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व धक्का बसल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात. मात्र, तरीही लोकभावनेने सरकारचा हात सोडलेला नाहीये, हेच या सरकारचे यश आहे. 

पहिला बळी पत्रकारितेचा
प्रोपगंडासाठी सर्वांत आधी बळी घेतला जातो तो पत्रकारितेचा. खोट्या बातम्या, सनसनाटी बातम्या, अर्धवट बातम्या, मुलामा चढवलेल्या बातम्या यांचा एकसुरी मारा लोकांवर करण्यात येतो. अलिकडेच सातत्याने चर्चेत असणारे अर्णब गोस्वामी यांचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. टीआरपी घोटाळ्यात आरोपी असणाऱ्या गोस्वामी यांनी पत्रकारितेची सर्व नैतिकता रसातळाला नेल्याचं उघड आहे. त्यांच्या लीक झालेल्या व्हॉट्सएप चॅटचा मामला चिंताजनक आहे. त्यात भारताच्या बालकोट प्रकरणासारख्या संरक्षणविषयक महत्वाच्या बाबींची आधीपासूनची माहिती आणि ज्या सार्वभौमत्वाविषयी सचिन तेंडुलकरने काळजी व्यक्ती केलीय, त्याच भारताच्या सार्वभौमत्वाची आणि जवानांच्या मृत्यूची थट्टा उडवणारी वक्तव्ये होती. यावर आता उतू गेल्यासारखे व्यक्त झालेले सेलिब्रिटी सोडा सत्ताधारी भाजप पक्षदेखील सोयीस्कररित्या मौनात होता आणि बगल देण्यासाठी 'तांडव' वरून तांडव करताना दिसून आला. खरंतर हे प्रकरण गंभीर असूनही त्यावर गवगवा झाला नाही. मात्र,  आज तेच लोक ग्रेटाच्या 'फार्मर्स प्रोटेस्ट टूलकिट'च्या कथित फाईलवर 'भारताच्या बदनामीचा आंतरराष्ट्रीय कट' म्हणत थयथयाट करत आहेत.

तज्ज्ञ काय म्हणतात?
याबाबत, माध्यमतज्ज्ञ डॉ. स्यू करी जान्सेन यांनी म्हटलंय की, राष्ट्रवाद, भांडवलशाही आणि जनसंपर्काची आधुनिक तंत्रे जेंव्हा एकत्र येतात, तेंव्हा त्या अतिशय परिणामकारण युद्धयंत्रणा तयार करु शकतात. याद्वारे, देशातील हरेक व्यक्तीची वर्तवणूक नियंत्रित करण्याचे आणि त्यांचे व्यक्तित्व प्रभावित करण्याचे कामच प्रोपगंडाद्वारे केले जाते. आज तुम्ही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बोलणं, त्यांच्या मागण्यांची बाजू मांडणं, हे तुम्ही 'टुगेदर' आलेल्या इंडियाच्या विरोधात जाणारं ठरतंय. शेतकऱ्यांना वगळून आज भारत युनायटेड झालाय. प्रोपगंडा याला म्हणतात.

- विनायक होगाडे

(ब्लॉगमधील मते ही लेखकाची स्वतःची आहेत. 'सकाळ माध्यम समूह' त्याच्याशी सहमत असेलच असे नाही.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.