Tuberculosis : प्रथिने, जीवनसत्वांमुळे घटतो क्षयरोगाचा धोका

प्रथिने व जीवनसत्त्वांचा मासिक आहारात पुरेसा समावेश केल्यास क्षयरोगाच्या रुग्णांच्या कुटुंबातील जवळपास निम्म्या सदस्यांचा क्षयरोग होण्याचा धोका घटतो.
Tuberculosis
Tuberculosissakal
Updated on

नवी दिल्ली - प्रथिने व जीवनसत्त्वांचा मासिक आहारात पुरेसा समावेश केल्यास क्षयरोगाच्या रुग्णांच्या कुटुंबातील जवळपास निम्म्या सदस्यांचा क्षयरोग होण्याचा धोका घटतो, असा निष्कर्ष ‘लॅन्सेट’ या जागतिक आरोग्यविषयक नियतकालिकातून काढण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय संशोधकांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत झारखंडच्या चार जिल्ह्यांतील २,८०० रुग्णांच्या कुटुंबीयातील सदस्यांना या संशोधनात सहभागी करून घेतले. यात सर्व रुग्णांना दर महिन्याला दहा किलो धान्य (तांदूळ, डाळी, दूध पावडर, तेल आदी) तसेच सहा महिन्यांसाठी जीवनसत्त्वांचा आहारही दिला.

त्याचप्रमाणे, रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना पाच किलो तांदूळ आणि प्रतिमहिना दीड किलो डाळ देण्यात आली. रुग्णांकडून कुटुंबात क्षयरोग पसरतो का, याची तपासणी करण्यात आली. ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२१ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात रुग्णांच्या कुटुंबात १०,३४५ सदस्यांचा समावेश होता.

रुग्णाच्या घरगुती संपर्कातील ५,६२१ पैकी ५,३२८ जणांचा हस्तक्षेप गटात समावेश करण्यात आला होता तर ४,७२४ पैकी ४,२८३ जणांचा नियंत्रित गटात समावेश केला. यातील दोन तृतीयांश व्यक्ती संथाल, मुंडा, भूमी आदी मूलनिवासी समुदायातील होत्या. त्याचप्रमाणे, ३,५४३ जण कुपोषित होत्या.

यावेळी क्षयरोगाच्या रुग्णांनी पौष्टिक आहार घेतल्याने सर्व प्रकारच्या क्षयरोगाचा संसर्ग ४० टक्क्यांनी तर संसर्गजन्य क्षयरोग जवळपास ५० टक्क्यांनी कमी होत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे, क्षयरोग झालेल्या रुग्णांमधील पौष्टिक आहाराची गरजही या संशोधनामुळे अधोरेखित झाली.

सुरुवातीच्या दोन महिन्यांत वजन वाढल्याने क्षयरोगाने मृत्यू होण्याचा धोका ६० टक्क्यांनी कमी झाला. याशिवाय इतरही अनेक फायदे झाले. संशोधनाच्या सुरुवातीला केवळ तीन टक्के रुग्णच काम करू शकत होते. त्यानंतर, ही टक्केवारी तब्बल ७५ वर पोचली. त्याचप्रमाणे, ३० कुटुंबांना क्षयरोग संसर्गाची एक घटना टाळण्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असल्याचेही संशोधकांनी नमूद केले.

संशोधकांच्या गटात कॅनडातील मॅकगिल विद्यापीठ, चेन्नईतील राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र, बंगळूरमधील राष्ट्रीय क्षयरोग संस्था, रांचीतील क्षयरोग सेल आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातील अधिकारीही सहभागी झाले होते.

भारतात ३० लाख रुग्ण

भारतात क्षयरोगाचे अंदाजे ३० लाख रुग्ण असून २०२१ मध्ये जवळपास पाच लाख जणांचा मृत्यू झाला. क्षयरोगविषयक राष्ट्रीय धोरणात्मक आराखड्यानुसार देशाने २०२५ पर्यंत क्षयरोगाचा संसर्ग ८० टक्के कमी करण्याचे तसेच मृत्यूदर ९० टक्के कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

क्षयरोगावरील उपचारात आहार हा महत्त्वाचा पूरक घटक ठरतो. औषधोपचाराबरोबरच रुग्णाच्या महिन्याच्या पुरेसा प्रथिनयुक्त आहार घेतल्याने रुग्णाचे वजन वाढण्यास मदत होऊ शकते. सुरुवातीच्या दोन महिन्यांत रुग्णांचे वजन वाढल्याने मृत्यूदर ६० टक्क्यांनी घटला. जवळपास निम्म्या गटांचा बीएमआय १६ पेक्षा कमी होता. इतर गटाच्या तुलनेत मृत्यूदरातही ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली.

- प्रा. अनुराग भार्गव, मंगलोर

दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्याने क्षयरोगाचा संसर्ग रोखण्यात मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे, पुढील काही वर्षांत क्षयरोग निर्मूलनाचे महत्त्वाकांक्षी ध्येय गाठता येईल. एकीकडे, आपण धोरणात्मक कृतींबद्दल विचार करत असतानाच आहारातील विविधता वाढविण्यासाठीही धोरणे आखावी लागतील. क्षयरोगाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या कुपोषित लोकांना पुरेसा प्रथिनयुक्त आहार पुरवावा लागेल.

- सौम्या स्वामिनाथन, माजी मुख्य वैज्ञानिक, जागतिक आरोग्य संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.