चंदीगढ : आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात, असं म्हणत अनेक जण संघर्षाची भुमिका घेतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं देखील उभारतात. या आंदोलनांमधील चिकाटी आणि संघर्ष जितका मोठा तितकंच ते आंदोलन लोकप्रिय होतं. असंच एक आंदोलन पंजाबमध्ये पहायला मिळालं आहे. या आंदोलनातील आंदोलनकर्त्याची चिकाटी पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल, यात शंका नाही. पंजाब सरकारद्वारे ईटीटी-टीईटी पास बेरोजगार शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात एका शिक्षकाने केलेलं आंदोलन भलतंच चर्चेस पात्र ठरलंय. हा शिक्षक तब्बल २०० फूट उंच मोबाईल टॉवरवर १३५ दिवस राहिला आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतरच मी खाली येईन, या एकमेव निर्धारासह वर चढलेला हा बेरोजगार शिक्षक जराही आपल्या निश्चयापासून ढळला नाही.
या बेरोजगार शिक्षकाचं नाव सुरिंदर पाल असं आहे. कडक उन असो वा जोरदार पाऊस, परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी आपला निर्धार सोडला नाही. तब्बल १३५ दिवसांपर्यंत हा युवक टॉवरवरच राहिला. टॉवरवरुन खाली उतरल्यानंतर जेंव्हा त्याच्या साथीदारांनी त्याचं स्वागत केलं तेंव्हा तो म्हणाला की, मी शपथ घेतलेली की जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोवर मी खाली उतरणार नाहीच. खरं तर ही बाब दुर्दैवाची आहे की, युवकांना नोकऱ्यांसाठी या प्रकारची आंदोलनं करावी लागत आहेत.
पोलिस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या युवकाला टॉवरवरुन खाली उतरवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, त्याच्या जिद्दीसमोर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. सरकारद्वारे बेरोजगार शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याच्या एका दिवसानंतर त्याने आपलं धरणे आंदोलन समाप्त केलं. टॉवरवर चढून बसलेल्या सुरिंदर पालला लगेचच पटियालामधील सरकारी राजिंदरा हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. डॉक्टरांनी त्यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगितलंय. चार महिन्यांहून अधिक काळ टॉवरवर बसून राहिल्याकारणाने त्याच्या चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम झाला होता. प्रकृती कमकुवत झाली होती. ते व्यवस्थित जमिनीवर उभे देखील राहू शकत नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.