सोलापूर : ‘‘देशातील जनतेवर इंग्रजांनी जेवढा अन्याय केला नाही, त्याहून अधिक अन्याय भाजपने केला आहे. देशातील ७० कोटी जनतेकडे जितका पैसा आहे, तेवढा पैसा पंतप्रधान मोदींच्या जवळील मोजक्याच अब्जाधीश मित्रांकडे आहे.
त्यांनी दहा वर्षांत शेतकरी, युवक, कामगार, गरिबांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे गरिबांचे कैवारी नव्हे तर अवघ्या २२ ते २५ अब्जाधीशांचे सरदार आहेत,’’अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सोलापुरात केली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभेनिमित्त राहुल गांधी यांची आज (बुधवारी) सोलापुरात सभा पार पडली. यावेळी प्रणिती शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माढ्यातील उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘मनरेगा’अंतर्गत २४ वर्षे कामे सुरू राहिल्यानंतर जेवढा पैसा गरिबांना मिळाला असता किंवा देशातील संपूर्ण शेतकऱ्यांना २४ वेळा कर्जमाफी देता आली असती, तेवढा पैसा (१६ लाख कोटी रुपये) नरेंद्र मोदींनी केवळ २२ ते २५ अब्जाधीशांना माफ केला. पण, गरिबांना काहीच दिले नाही.
देशातील ७० कोटी लोकांकडे जेवढा पैसा आहे, तेवढा पैसा २२ ते २५ अब्जाधीशांकडे आहे. देशातील केवळ एक टक्के लोकांकडे ४० टक्के पैसा आहे. नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर येईल म्हणाले, पण जीएसटी लादून मोदींनी मोजक्यांनाच अब्जाधीश बनवले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याचे आश्वासन दिले, पण त्यांचा शेतमाल बाजारात आला की भाव पडतो. दुसरीकडे टूथपेस्ट, चिप्स, ज्यूस विकणाऱ्याचा मोठा फायदा होतो.
भुकेने मरणारा गरीब, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यावर माध्यमे काहीच बोलत नाही. माध्यमांचे मालक व देशातील बड्या २०० कंपन्यांचे मालक मराठा, धनगर, दलित, आदिवासी कोणीच नाहीत.’’ निवडणूक रोखे प्रकरण नरेंद्र मोदींना निवडणुकीनंतर निश्चितपणे महागात पडेल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला.
देशातील जातीनिहाय जनगणना करून ज्यांची जेवढी संख्या त्यांना तेवढा हक्क दिला जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. ‘‘आर्थिक क्षेत्रात कोणाकडे किती पैसा आहे व संस्थांमध्ये कोणते लोक कामाला आहेत, मागासवर्गीय उच्चपदस्थ अधिकारी किती, याचाही अभ्यास केला जाईल. खासगी दवाखाने, मीडिया, खासगी उद्योगांचे मालक कोण?
याचाही सर्व्हे होईल. जातीनिहाय जनगणना करणार म्हटल्यावर मोदी घाबरले आणि लगेच त्यांनी चीन, पाकिस्तानचा विषय काढला. पण, आता जुमलेबाजी चालणार नाही, कारण राज्यघटना वाचविण्यासाठी जनताच मैदानात उतरली आहे,’’ असे गांधी म्हणाले.
‘‘शेतकऱ्यांना आम्ही हमीभाव देऊ. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी जाणून घेण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन केला जाईल. सत्तेत आल्यावर पहिल्यांदा कर्जमाफी देऊ, पण ज्या ज्यावेळी शेतकरी अडचणीत असेल त्यावेळी हा आयोग अभ्यास करून कर्जमाफीची शिफारस करेल. त्या त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल,’’अशी ग्वाही राहुल गांधींनी यावेळी दिली.
देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरू आहे. भाजपने आता महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर भाजपने गेल्या दहा वर्षात काय केले हे जनतेसमोर मांडावे.
- पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेसचे नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.