Rahul Gandhi : वायनाड की रायबरेली? राहुल गांधी यांचा संभ्रम कायम!

काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड की रायबरेली या दोनपैकी कोणता लोकसभा मतदारसंघ सोडणार, याबद्दलचा संभ्रम अद्यापही कायम आहे.
Rahul gandhi
Rahul gandhisakal
Updated on

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड की रायबरेली या दोनपैकी कोणता लोकसभा मतदारसंघ सोडणार, याबद्दलचा संभ्रम अद्यापही कायम आहे. दोन्ही मतदारसंघातील लोकांना आवडेल, असा निर्णय घेईन एवढे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

केरळमधील वायनाड व उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन मतदारसंघातून काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी निवडून आलेले आहेत. नियमाप्रमाणे त्यांना १५ दिवसांच्या आत एका मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागणार आहे. आता वायनाड की, रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून साडेतीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्यांनी ते निवडून आलेले आहेत.

रायबरेलीमध्ये काल (मंगळवारी) तर वायनाडमध्ये आज (बुधवारी) त्यांनी आभार सभा घेतली. या सभेत ते वायनाडचा मतदारसंघ सोडण्याची घोषणा करण्याची शक्यता होती. परंतु यावेळी त्यांनी तसे काहीही केलेले नाही. यावेळी बोलताना त्यांनी कोणता मतदारसंघ सोडावा, याबद्दल संभ्रमात असल्याचे सांगितले. ‘‘दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी खूप प्रेम दिले. दोन्ही मतदारसंघातील मतदार खूष राहतील, असाच निर्णय घेईन’’ असे सांगून द्वेष व तिरस्कार पसरविणाऱ्या शक्तींना मतदारांनी नाकारल्याचे राहुल गांधींनी सांगितले.

वायनाड सोडणार?

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी वायनाडच्या लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. वायनाडला जाऊन आभार मानल्यानंतर ते काही दिवसांनी राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. वायनाडच्या पोटनिवडणुकीत तेथील स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्याला संधी मिळेल, असेही सांगितले जात आहे.

विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

नरेंद्र मोदी ३.० सरकारच्या कार्यकाळातील पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार असून पहिल्याच विशेष अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींचे अभिभाषण, नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड हा या अधिवेशनाचा प्रमुख अजेंडा आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संसदेच्या अधिवेशनाची तीन जुलै रोजी सांगता होईल.

२४ ते २६ जून या कालावधीत नवनिर्वाचित खासदारांना हंगामी अध्यक्षांकडून शपथ दिली जाईल. त्यानंतर २७ तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उभय सदनातील सदस्यांसमोर अभिभाषण होईल. याच दिवशी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांचा परिचय करुन देतील.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे बळ वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांकडून सरकारची कोंडी केली जाऊ शकते. विरोधकांनी भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्यापासून रोखले होते. यामुळे अर्थातच इंडिया आघाडीचे मनोबल उंचावलेले राहणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष राहील. मोदी सरकारच्या याआधीच्या दोन कार्यकाळात क्रमश: सुमित्रा महाजन आणि ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेल्या तेलगू देसम पक्ष आणि संयुक्त जनता दलाने अध्यक्षपदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे सरकार यातून कशा प्रकारे मार्ग काढणार, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सतराव्या लोकसभेत उपाध्यक्ष पदावर कोणालाही नेमण्यात आले नव्हते. त्यामुळे यावेळी उपाध्यक्ष नेमण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.