जयपूर : अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. सरकार बरेच काही लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी मीडियावर देखील टिप्पणी केली आहे. राहुल गांधी यांचा माध्यमांशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे.
या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले की, "या पत्रकार परिषेदेपूर्वी मी माझ्या मित्रासोबत जेवण करत होतो. तेव्हा मी त्याला म्हणालो की मी शर्यत लावतो की प्रेसवाले मला सर्व गोष्टींबाबत प्रश्न विचारतील पण चीन बद्दल एकही प्रश्न विचारणार नाहीत. ज्यांना दोन हजार चौरस किलोमिटर भारताकडून बळकावला, ज्यांनी भारताच्या २० जवानांना शहीद केलं, जे अरुणाचल प्रदेशात जवानांना मारहाण करत आहेत त्यांच्याबद्दल भारतातील मीडिया एक प्रश्न विचारणार नाही. आणि हे सत्य होतं" त्यांच्या या विधानाला पत्रकारांनी विरोध करताच राहुल गांधी पुढे म्हणाले की, "भावांनो देश पाहतोय, असा विचार करू नका की पाहात नाहीये".
राहूल गांधी काय म्हणाले?
चीनसोबतच्या संघर्षाबाबत राहुल गांधी म्हणाले, चीनने भारताची 2 हजार चौरस किलोमीटर जमीन हिसकावून घेतली आहे. अरुणाचल प्रदेशात ते आमच्या सैनिकांना मारहाण करत आहेत. आमचे 20 जवान शहीद झाले. देश पाहत आहे. असे समजू नका की कोणी पाहत नाही. चीनचा धोका लपवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या दिशेने तयारी सुरू आहे. ही युद्धाची तयारी आहे, घुसखोरीची नाही. भारत सरकार इव्हेंटच्या आधारावर काम करते, परंतु धोरणात्मकपणे काम करत नाही.
राहुल गांधी म्हणाले की, चीनचा धोका स्पष्ट आहे. सरकार दुर्लक्ष करत आहे, पण असे होणार नाही. भारत सरकार झोपले आहे आणि त्यांना काहीच ऐकायचे नाही. चीन युद्धाच्या तयारीत असल्याचे चीनच्या शस्त्रास्त्रांवरून स्पष्ट झाले आहे. आपण सावध असले पाहिजे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बोलत राहतात, पण त्यांनी आपली समज वाढवली पाहिजे. राहुल गांधींना चीनबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, हा प्रश्न आता प्रेसला आठवत आहे. यावर रिपोर्टर म्हणाली की ती संधीची वाट पाहत होती. आज भारत जोडो यात्रेचे १०० दिवस पूर्ण झाल्याबद्दल राहुल गांधी हे जयपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.