मोदी आडनावावरून केलेले विधान राहुल गांधी यांना चांगलेच भोवल्याचे पाहायला मिळत आहे. सूरत न्यायालयाने या प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर जामीनही दिला. मात्र, या आधारे लोकसभेतील राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. देशभरात राहुल गांधींच्या समर्थनात आंदोलन सुरु आहे. अशातच ठाकरे गटानेही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. (rahul gandi over to vinayak damodar savarkar statment uddhav thackeray saamana editorial)
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यावर त्यांनी माफी माागायला मी काही सावरकर नाही. माझं आडनाव गांधी आहे, असा पुनोरच्चार करत भाजपला डिवचलं होतं. याचाच धागा पकडत ठाकरे यांनी निशाणा साधलाय.
काय म्हटले आहे सामना अग्रलेखात?
हुकूमशहा हा सदैव डरपोकच असतो. हुकूमशहा आधी न्यायव्यवस्था ताब्यात घेतो, संसदेवर ताबा मिळवतो व विरोधकांना नष्ट करतो. यालाच गुलामी म्हणतात. याच गुलामीविरुद्ध लढण्यासाठी वीर सावरकरांनी वयाच्या बाराव्या वर्षी घरातील अष्टभुजा देवीसमोर क्रांतिकारक शपथ घेतली.
‘‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन!’’ राहुल गांधी यांनी अशीच शपथ घेऊन सध्याच्या गुलामीविरुद्ध लढा उभारायला हवा.
राहुल गांधी वारंवार बोलत आहेत की, मी घाबरत नाही. मला तुरुंगात डांबले तरी प्रश्न विचारत राहीन. श्री. राहुल गांधी हे घाबरत नाहीत व अदानी-मोदी संबंधांवर वारंवार प्रश्न विचारीत आहेत हे खरेच, पण राहुल गांधी यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या संपूर्ण पक्षाला व देशालाही निर्भय बनविण्याची गरज आहे.
‘‘माझे आडनाव सावरकर नाही’’, अशी विधाने वारंवार करून ही निर्भयता निर्माण होणार नाही व वीर सावरकर यांच्या बाबतीत जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेलाही तडा जाणार नाही. वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत.
सावरकरांना अकारण ‘माफीवीर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही. ‘वीर सावरकर’ या नावात तेज आहे. अन्याय व गुलामीविरुद्ध लढण्याचे बळ आहे.
वीर सावरकरांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंग्लंड व आपल्या देशातही योद्धे निर्माण केले, त्या योद्धय़ांनी जुलमी राज्यकर्त्यांवर ‘धाडधाड’ गोळय़ा चालवल्या व त्या कृत्याबद्दल सावरकरांनी कधीच खेद व्यक्त केला नाही.
सावरकरांनी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील. मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली हा अन्याय आहे, पण वीर सावरकरांची मानहानी करून ते ज्या सत्यासाठी लढू पाहत आहेत, त्या सत्याचा विजय होणार नाही.
राहुल गांधी हे शहीदांच्याच कुटुंबात जन्मास आले व ते खरेच आहे. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढय़ात वडिलोपार्जित सर्वस्व पणास लावले. त्यांनी त्यांचा काळा पैसा एखाद्या अदानीत गुंतवून व्यापार केला नाही.
त्यांचे जीवन देशासाठीच होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही देशासाठी सर्वोच्च बलिदान केले व त्या बलिदानाची जाणीव देशाला सदैव राहील, पण वीर सावरकर, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने राष्ट्रासाठी तितकाच महान त्याग केला. त्या महान त्यागाची अवहेलना कुणालाच करता येणार नाही.
नाशिकचा कलेक्टर जॅक्सनच्या वधाचे सूत्रधार म्हणून वीर सावरकरांना काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावली. राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतली, पण सावरकरांची ‘बॅरिस्टर’ ही पदवीच इंग्रजांनी काढून घेतली. त्यांचे सर्व साहित्य जप्त केले.
वीर सावरकरांचे जीवन प्रेरणादायी होते व राहील. सावरकर इंग्रजांना कधीच घाबरले नाहीत. पन्नास वर्षे काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावल्यावरही ते हसत हसत म्हणाले, ‘‘पण इंग्रजांचे राज्य माझ्या देशावर पन्नास वर्षे राहील काय? त्याआधीच ते उलथवून टाकू.’’
वीर सावरकर समजून घेण्यासाठी मोठे मन व वाघाचे काळीज पाहिजे. सावरकरांचा अवमान वा त्यांच्यावर चिखलफेक करण्यापूर्वी सावरकरांचे मोठेपण समजून घेतले तर स्वातंत्र्यवीरांची बेअदबी अथवा हेटाळणी करण्यास कोणीही धजावणार नाही.
कोण होते सावरकर? सावरकर हे जगातील असे एकमेव स्वातंत्र्य योद्धे होते, ज्यांना जन्मठेपेच्या दोन-दोन शिक्षा झाल्या. सावरकर हे जगातील असे पहिले लेखक होते ज्यांच्या ‘1857 चा स्वातंत्र्यसंग्राम’ या पुस्तकावर दोन देशांनी प्रकाशनापूर्वीच बंदी घातली होती.
इंग्लंडच्या राजाप्रति निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार देणारे पहिले हिंदुस्थानी विद्यार्थी होते वीर सावरकर. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन करतानाच बंदिवासातील जीवन संपल्यावर अस्पृश्यता आणि इतर कुप्रथांविरुद्ध आंदोलन करणारे कर्ते समाजसुधारक म्हणून सावरकरांनी दिलेले योगदानही विलक्षण आहे.
सावरकर हे जगातील असे एकमेव कवी आहेत, ज्यांनी अंदमानच्या काळकोठडीत भिंतीवर खिळे व कोळशाने कविता लिहून त्या पाठ केल्या आणि कारागृहातून सुटल्यावर पाठ केलेल्या कवितांच्या 10 हजार ओळी पुन्हा लिहून काढल्या. विदेशी वस्त्रांची होळी करणारे हिंदुस्थानचे आद्य राजकारणी म्हणूनही नाव पुढे येते ते सावरकरांचेच.
वीर सावरकरांची थोरवी सांगायची तरी किती? पण विद्यमान राजकारणात सावरकरांचे नाव ओढून त्यांना खुजे ठरवण्याचा प्रयत्न क्लेशदायक आहे. राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.