भाजपच्या उमेदवाराने 6 हजार 941 मतांनी आघाडी घेतल्याने शिवसेनेच्या गुढा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थानात भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, भाजपनं स्पष्ट बहुमताकडं वाटचाल सुरू केलीये. राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) सध्या 110 ते 115 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसचे 70 उमेदवार आघाडीवर आहेत.
याच दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत आणखी एका नेत्याची जोरदार चर्चा झाली. ती म्हणजे, काँग्रेसमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांची. गुढा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर उदयपूरवाटी या मतदारसंघातून (Udaipurwati Assembly Constituency) निवडणूक लढवली आहे.
एकनाथ शिंदे हे स्वत: गुढा यांच्या प्रचारासाठी थेट राजस्थानात गेले होते. यावेळी त्यांनी तिथे शिवसेना उमेदवाराचा जोरदार प्रचार केला. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, उदयपूरवाटी मतदारसंघातून राजेंद्र गुढा (Rajendra Singh Gudha) हे पिछाडीवर असल्याचं दिसत आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंतच्या मतमोजणीत भाजप उमेदवार शुभकरण चौधरी यांनी आघाडी घेतली आहे. चौधरींना 25 हजार 661 मते मिळाली असून शिवसेनेचे राजेंद्र सिंह गुढा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 18 हजार 720 मतं मिळवण्यात यश आलंय.
भाजपच्या उमेदवाराने 6 हजार 941 मतांनी आघाडी घेतल्याने शिवसेनेच्या गुढा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अद्याप, या जागेचा निकाल स्पष्ट झालेला नाही. दरम्यान, या जागेवर भाजपनं आपल्या पक्षाकडून गतवेळचे उपविजेते राहिलेल्या शुभकरण यांना उमेदवारी दिली आहे. 2018 च्या निवडणुकीत भाजपचा येथे बसपाशी सामना झाला, ज्यामध्ये मायावतींचा 'हाथी' विजयी झाला. राजेंद्र सिंह गुढा यांनी 2018 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.