Rajasthan Vidhansabha Election : ‘जो गरीब की सोचेगा, उसे वोट’; जोधपूरमधील कष्टकऱ्यांची भावना

पाली, जोधपूर या परिसरातील कष्टकऱ्यांच्या, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, हॅाटेलमधील वेटर यांच्या भावना.
Jodhpur fort
Jodhpur fortsakal
Updated on

पाली (राजस्थान) - ‘सरकारने गरीबोंके लिए अच्छी योजनाँए लाई, लेकिन सबको वो मिलती है क्या, हमारी कमाईमे बच्चोंकी शिक्षा नही हो सकती, सरकारी विद्यालयोंमें अच्छी शिक्षा नही है, इसलिए इस इलेक्शन मै जो गरीबकी सोचेंगा उसको ही हम वोट देंगे,’ या भावना आहेत पाली, जोधपूर या परिसरातील कष्टकऱ्यांच्या, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, हॅाटेलमधील वेटर यांच्या.

काँग्रेसच्या योजनांची भुरळ त्यांच्यावर पडल्याचे जाणवले पण मतदान करताना ‘आमचा विचार जो करेल त्यालाच आमचे मत असेल’ असेही त्यांनी सांगितले.

‘माझ्या मुलीला बारावीत चांगले गुण मिळाले, पण पैशांअभावी तिला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला मी प्रवेश घेऊ शकलो नाही, त्यातून मुलीच्या भवितव्याची चिंता वाटत आहे, ती कशी सोडवायची, रिक्षातून फारशी कमाई होत नाही, स्वतःची रिक्षा नाही अशा परिस्थितीत कुटुंब चालवतानाच कसरत होते मग मुलांचे शिक्षण कसे करायचे,’ असा सवाल मंगल माच्छावत या रिक्षाचालकाने केला.

‘काँग्रेसने गेल्या पाच वर्षात चांगले काम केले, गरिबांसाठी योजना आणल्या, पण त्या खऱ्या लाभार्थ्यांपर्यत पोहचत नाहीत. शासकीय अधिकारी आणि संबंधित भागांतील पुढारी खोटी नांवे सांगून योजनेचे पैसे हडप करतात, मी झोपडपट्टीत राहतो, मला वीज बिल आणि पाणीपट्टी माफ आहे, माझी स्वतःची रिक्षा आहे, त्यातून कुटुंबाचे खाण्यापिण्याचे भागते पण मुलांच्या शिक्षणासाठी पैसे शिल्लक राहात नाहीत,’ अशी व्यथा दुसरे रिक्षाचालक नरपतराम दहिया यांनी सांगितली.

सरकारी नोकर भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांतील पेपरफुटीवरून हॅाटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या किशनसिंग यांनी प्रचंड राग व्यक्त केला. ‘गेल्या पाच वर्षांत झालेल्या सर्व परीक्षांचे पेपर अगोदरच फुटले, मग पात्र उमेदवारांनी काय करायचे,’ असा सवालही त्यांनी केला. सद्या सरकारी नोकर भरतीतील पेपरफुटीवरूनच राज्यातील गेहलोत सरकारला भाजप नेत्यांकडून धारेवर धरले जात आहे.

कुटुंबाचा गुजराण कसा करू?

‘कोरोनापूर्वी मी स्वतःची नवी मोटार खरेदी केली, त्यानंतर लगेच टाळेबंदी सुरू झाली आणि दोन-तीन वर्ष व्यवसाय बंद राहिला. मोटारीचे हप्ते थकले, त्यातून मोटार बँकेने ओढून नेली आणि ती नंतर विकावी लागली. त्यावेळी सरकारने आमच्यासारख्या कष्टकऱ्यांसाठी काही केले नाही. सद्या मी दुसऱ्याच्या मोटारीवर चालक आहे, महिन्याला मला १२-१३ हजार रुपये मिळतात, त्यावर कुटुंबाचा गुजराण कसा होणार?’ असा प्रश्न मोटारचालक राजेश आदिवासी यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.