Sudha Murty : ‘पारितोषिक म्हणजे लोकमान्यांचा आशीर्वाद’ ; खासदार सुधा मूर्ती यांचा नवी दिल्लीत टिळक राष्ट्रीय सन्मानाने गौरव

नामवंत लेखिका, राज्यसभा सदस्य, इन्फोसिसच्या सहसंस्थापक सुधा मूर्ती यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पारितोषिकाने राजधानी दिल्लीत एका नेटक्या समारंभात गौरविण्यात आले.
Sudha Murty
Sudha Murtysakal
Updated on

नवी दिल्ली : नामवंत लेखिका, राज्यसभा सदस्य, इन्फोसिसच्या सहसंस्थापक सुधा मूर्ती यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पारितोषिकाने राजधानी दिल्लीत एका नेटक्या समारंभात गौरविण्यात आले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १९८३ पासून सुरू करण्यात आलेल्या या पारितोषिकाच्या सुधा मूर्ती या ४२ व्या मानकरी ठरल्या. डॉ. दीपक टिळक यांनी शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये देऊन सुधा मूर्ती यांचा गौरव केला. या पारितोषिकाची रक्कम सुधा मूर्ती यांनी पुण्यातील ‘मेक्स न्यू लाइफ’ या स्वयंसेवी संस्थेला अर्पण केली. वीस वर्षांपूर्वी नारायण मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पारितोषिकाने गौरविण्यात आले होते.

‘‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पारितोषिकाच्या रूपाने आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळाला,’’ अशी भावना सत्कारमूर्ती सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. ‘लोकमान्यांच्या नावाचे आमच्या घरात दोन पुरस्कार लाभले’, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘‘वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत मी १८ वर्षे काम केले. हे काम करताना समाजातील सर्व स्तरातील लोकांना गोळा करण्याची प्रेरणा मला लोकमान्य टिळकांकडून मिळाली. मी आपल्या कार्याचा नेहमीच आनंद घेतला. कामावर प्रेम केले. हा माहेरचा पुरस्कार आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आलेले आम्ही पहिलेच जोडपे असू,’’ असे त्या म्हणाल्या.

‘‘माझे कोल्हापुरी मराठी आहे. मी शाहू महाराजांच्या गावची. माझे डॉक्टर वडील जयसिंगपूर, कुरुंदवाड, सांगली या भागात होते. नंतर आम्ही कर्नाटकात धारवाडला गेलो. पण माझे प्राथमिक शिक्षण मराठीतच झाले. माझे हृदय महाराष्ट्रात आहे. कोल्हापूरची मराठी पुण्यापेक्षा वेगळी. त्यामुळे मी इंग्लिशमध्ये बोलणार,’’ असे त्या म्हणाल्या.

लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथी दिनी एक ऑगस्ट रोजी देण्यात येणारा हा पुरस्कार प्रदान सोहळा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदा प्रथमच दिल्लीत आयोजित करण्यात आला. नवीन महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. व्यासपीठावर श्रीमंत शाही छत्रपती महाराज, डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक आणि डॉ. प्रणती टिळक होते. याप्रसंगी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायण मूर्ती, केंद्रीय मंत्री, लोकसभा व राज्यसभेचे खासदार तसेच दिल्लीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘आजचा हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या सुधा मूर्ती यांना मिळतो ही आनंदाची गोष्ट आहे आणि तो देशाच्या राजधानीत दिला जात आहे, याचे समाधान आहे,’’ असे शरद पवार म्हणाले. ‘‘लोकमान्यांच्या सहभागशिवाय देशाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेसचा चेहरा बदलण्याचे ऐतिहासिक काम लोकमान्यांनी केले. अखेरच्या काळात लोकमान्यांनी कोल्हापुरात यावे, असा आग्रह शाहू महाराजांनी केला. त्याचा स्वीकार लोकमान्यांनी केला नाही. पण लोकमान्यांची देखभाल करण्यासाठी आपल्या एका व्यक्तीची नेमणूक केली आणि वैद्यकीय गरजांची पूर्तता खबरदारी शाहू महाराजांनी घेतली.’’

‘‘इन्फोसिसने देशात आणि देशाच्या बाहेर लोकांना जी संधी दिली त्याचे संख्याबळ बघितले तर त्याची तुलना होऊ शकत नाही. अमेरिकेत इन्फोसिसमध्ये तीन लाखांहून अधिक लोक काम करतात. नारायण मूर्ती यांच्या या प्रचंड कार्यात विधायक दृष्टिकोन ठेवणाऱ्या सुधा मूर्ती यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे,’’ असे पवार म्हणाले.

‘‘भारताला पुढे नेण्यात ‘इन्फोसिस’ने मोठी भूमिका बजावली असून त्यात सुधा मूर्ती यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. या पुरस्कारासाठी त्यांची निवड यथार्थ आहे,’’ असे यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज मनोगत व्यक्त करताना म्हणाले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी प्रास्ताविक केले, डॉ. रोहित टिळक यांनी सुधा मूर्ती यांचा परिचय करून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.