Sakal Survey 2024 : पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वाची लढाई

Assembly Election 2024 : पुणे, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांतील सात लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीने चार मतदारसंघांत विजयाची पताका फडकावली. महायुतीला तीन जागांवरच समाधान मानावे लागले.
Assembly Election 2024
Assembly Election 2024sakal
Updated on

सहकाराची पंढरी आणि वाढते शहरीकरण यांचा मिलाफ असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीच्या भल्या भल्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. पुणे, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांतील सात लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीने चार मतदारसंघांत विजयाची पताका फडकावली. महायुतीला तीन जागांवरच समाधान मानावे लागले.

भाजपसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला येथे मोठा फटका बसला. हा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. पक्षफुटीनंतर बहुतांश आमदार, दुसऱ्या फळीतील नेते अजित पवार यांच्यासमवेत गेले. अजित पवार सोडून राष्ट्रवादी काय असणार, असा प्रश्न उपस्थित झाला.

पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी तयार झालेली सहानुभूतीची लाट, ग्रामीण भागात अजित पवारांची स्थानिक शिलेदारांवर असलेली भिस्त, त्यांच्याबद्दल जनमानसात असलेली नाराजी, भाजपचे ग्रामीण भागातील कमजोर संघटन याचा परिपाक म्हणून लोकसभेच्या निकालाकडे बघावे लागेल. मतदारांनी फोडाफोडीचे राजकारण नाकारले.

लोकसभेतील वातावरण आजही कायम असल्याचे ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर व सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षणात भाग घेतलेले ४७ टक्के मतदार महाविकासआघाडीच्या तर ३५ टक्के महायुतीच्या बाजूने आहेत. १३ टक्के मतदारांनी अद्याप काहीही ठरविलेले नाही.

तब्बल २९ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दर्शविली. तर २५ टक्के मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. कॉंग्रेसला १५, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या ८ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सात टक्के तर शिवसेनेला पाच टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा आमने - सामने

विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा आमने - सामने येणार आहेत. या तुल्यबळ मुकाबल्यात अजित पवारांपुढे आमदारांची संख्या कायम राखण्याचे खडतर आव्हान आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नऊ आमदार आहेत.

नगरमध्ये दोन व साताऱ्यात दोन आमदार आहे. ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात तब्बल २५ टक्के मतदारांनी राष्ट्र्वादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला पसंती दिली आहे. शरद पवार यांना असलेली सहानुभूती व लोकप्रियता कायम असल्याचे हे द्योतक आहे.

तसेच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातून डॉ अमोल कोल्हे , नीलेश लंके यांच्या रुपात नवीन स्थानिक नेतृत्व आकार घेईल. अशावेळी घरवापसीचे दरवाजे उघडणे अनेकांसाठी अवघड तर होईलच शिवाय निवडणुकीतही मोठे आव्हान अजित पवारांसमोर असेल.

शरद पवार यांनी विधानसभेच्या दृष्टीने जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यांच्याकडे सध्या तीन जिल्ह्यांत चार आमदार आहेत. ही संख्या वाढवण्यासाठी ते काय पावले उचलणार याकडे राज्याचे लक्ष आहे. त्यांच्या पक्षातून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुन्हा गद्दारांना थारा नको अशीही भावना पक्षात जोर धरत आहे. दोन्ही राष्ट्रवादीसाठी आगामी निवडणूक अस्तित्वाची लढाई असेल.

काँग्रेसची मतपेढी कायम

काँग्रेसकडे सध्या पुणे, नगर (प्रत्येकी ३) तर साताऱ्यात एक असे सात आमदार आहेत. पक्षाकडे पारंपारिक मतपेढी आहे. लोकसभेला देशात मिळालेले यश कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारे आहे. बदलत्या राजकीय समीकरणात ही संख्या वाढविण्याची संधी पक्षाकडे आहे.

भाजपकडून तातडीने पावले

पुणे जिल्ह्यात भाजपचे ८ तर साताऱ्यामध्ये दोन, नगरमध्ये तीन आमदार आहेत. लोकसभेनंतर खडबडून जागे झालेल्या भाजपने तातडीने पावले उचलण्यास सुरवात केली. मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद देतानाच त्यांच्याकडून पक्षासाठी या भागात सहकार क्षेत्राची मोट बांधण्याची अपेक्षा असेल. योगेश टिळेकर (माळी ओबीसी) आणि अमित गोरखे (मातंग) या तरुण नेत्यांना विधानपरिषदेवर संधी देत पक्षाने जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यातून पक्षासाठी पुणे महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला आहे.

दोन्ही शिवसेनेची कसोटी

शिवसेनेचे सातारा जिल्ह्यात दोन आमदार आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा एकही आमदार नाही. मात्र दोन्ही शिवसेनेकडे प्रत्येकी एक खासदार आहे. त्या जोरावर दोन्ही पक्षांनी जागावाटपात जास्त जागा पदरात पाडून घेतल्यास ताकद वाढविता येणार आहे. एकनाथ शिंदे उमेदवारांमागे भरपूर ताकद उभी करतात हे लोकसभेत दिसले पण विधानसभेला शिंदे यांना अशीच ताकद महायुतीमागे उभी करावी लागेल.

  • भाजप- 29.00%

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)- 24.99%

  • काँग्रेस- 15.05%

  • राष्ट्रवादी काँग्रेस -8.24%

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- 7.66%

  • इतर- 5.64%

  • शिवसेना -4.34%

  • वंचित बहुजन आघाडी -1.29%

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 0.98%

  • अपक्ष- 0.85%

  • शेकाप- 0.73%

  • आम आदमी पक्ष- 0.30%

  • एमआयएम -0.27%

  • बहुजन विकास आघाडी -0.26%

  • स्वाभिमानी शेतकरी पक्ष- 0.20%

  • प्रहार- 0.12%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.