Sakal Survey 2024 : मुंबईचा कौल ‘मविआ’च्या बाजूने?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईने महाविकास आघाडीला साथ दिली. मुंबईतील सहापैकी दोन जागा महायुतीला मिळाल्या.
Sakal Survey 2024
Sakal Survey 2024sakal
Updated on

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईने महाविकास आघाडीला साथ दिली. मुंबईतील सहापैकी दोन जागा महायुतीला मिळाल्या. मुंबई उत्तरमधून पीयूष गोयल आणि मुंबई उत्तर-पश्चिममधून रवींद्र वायकर सोडल्यास एकाही जागी महायुतीला यश मिळाले नाही. मुंबईकरांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा पाठिंबा दिल्याचे चित्र आहे.

त्यामुळे विधानसभेतही तेच चित्र दिसेल, अशी शक्यता आहे; मात्र भाजपसह महायुतीने आता जोरदार तयारी सुरू केली. त्यामुळे सर्वत्र अटीतटीच्या लढती होणार, अशी चिन्हे आहेत. अनेक मतदारसंघांत उमेदवार कोण किंवा इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांत युती आणि आघाडीचा उमेदवार ठरवण्यात कस लागणार आहे. शिवाय त्यामुळे होणारी बंडखोरी, पक्षांतराचे मुद्देही महत्त्वाचे ठरतील.

मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी भाजपला सर्वाधिक १६ जागा मिळाल्या. त्याखालोखाल शिवसेना १३, काँग्रेस पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली.

लोकसभा निवडणुकीत मुंबईवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वर्चस्व दिसले. मुंबईतील विकास प्रकल्प हा यंदा महायुतीच्या प्रचारात प्रमुख मुद्दा असेल; मात्र तरीही पुनर्विकासाचे मुद्दे, पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, कोळीवाडे, मराठी विरुद्ध गुजराती वाद असे अनेक मुद्दे कळीचे ठरणार आहेत.

‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतही मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून ‘मविआ’ला सर्वाधिक ५१ टक्के पसंती मिळाली. महायुतीला २९ टक्के पाठिंबा मिळालेला दिसतो. काँग्रेसला सर्वाधिक पसंती देत २५ टक्के लोकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर भाजप २१ टक्के, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला २० टक्के नागरिकांनी पसंती दाखविली; मात्र विधानसभेला उमेदवारीचे चित्र कसे असेल, यावर मतदारांचा कल अवलंबून असेल.

ठाणे : काही ठिकाणी चित्र बदल शक्य

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण या दोन्ही मतदारसंघात महायुतीने विजय मिळवला. भिवंडी लोकसभा खेचून आणण्यात महाविकास आघाडीला यश आले. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा दिसत असला तरी प्रत्यक्षात एका जागेचे नुकसान झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पडलेल्या मतांची गोळाबेरीज आणि त्यानंतर मतदारांचा कौल घेतला असता आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १८ जागांपैकी किमान पाच ते सहा ठिकाणी राजकीय प्रस्थापित चित्र बदलण्याची शक्यता आहे.

लोकसभेला महायुतीचे नरेश म्हस्के यांनी ‘मविआ’तील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते राजन विचारे यांचा अनपेक्षित पराभव केला. २०१९ मध्ये १८ जागांपैकी शिवसेनेकडे पाच, भाजपला नऊ, राष्ट्रवादीला दोन, तर मनसे आणि समाजवादी पक्षाकडे प्रत्येकी एक जागा होती.

ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा एकही आमदार नाही; पण सद्यस्थितीत ठाकरे गटाला किमान दोन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पश्चिम येथे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. भिवंडी पश्चिम, उल्हासनगर हे दोन विधानसभा राखण्यासाठी भाजपसमोर आव्हान दिसते. शहापूरमधील एकमेव राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारालाही धोक्याचा इशारा आहे.

पालघर : बदलत्या समीकरणाकडे लक्ष

लोकसभेला पालघरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी विजय मिळवला. जनतेने महायुतीला कौल दिल्याने विधानसभेत समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पालघरमधील सहा विधानसभा क्षेत्रात महायुतीतील शिवसेनेत सहभागी झालेले श्रीनिवास वनगा,

डहाणू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले, विक्रमगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सुनील भुसारा, बहुजन विकास आघाडीचे वसईचे हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्यातून क्षितिज ठाकूर व बोईसरमधून राजेश पाटील हे तीन आमदार आहेत.

महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांना लोकसभेत चांगली मते मिळाली. त्यामुळे वसई, नालासोपारा व पालघर, बोईसर विधानसभेत भर द्यायला हवा, तर महायुतीदेखील वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड आणि डहाणू भागात आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करू शकते. आगामी विधानसभेत महायुती, मविआ आणि बहुजन विकास आघाडी हे पक्ष आपले राजकीय वर्चस्व निर्माण व्हावे, म्हणून प्रयत्न करणार आहेत.

  • काँग्रेस -25.83%

  • भाजप -21.93%

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) -20.37%

  • शिवसेना -8.66%

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) -8.03%

  • इतर- 5.08%

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना -2.50%

  • बहुजन विकास आघाडी -2.27%

  • राष्ट्रवादी काँग्रेस- 1.76%

  • वंचित बहुजन आघाडी -1.18%

  • अपक्ष -0.85%

  • आम आदमी पक्ष -0.50%

  • एमआयएम -0.37%

  • शेकाप -0.24%

  • स्वाभिमानी शेतकरी पक्ष -0.24%

  • प्रहार -0.12%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.