मुंबईः लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षाकडून या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. या निवडणूकीसाठी साधारण १५ मार्चच्या दरम्यान आचारसंहिता लागू शकते. यादरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीने एक सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राचा मूड नेमका काय आहे, हे समोर आलेलं आहे. महाराष्ट्राची सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थिती बघता जनतेला नेमका कौल जाणून घेण्याचा 'सकाळ'ने प्रयत्न केला आहे. ( Sakal Survey 2024 Latest News)
राज्यभरातून एकूण ३४,९७८ लोकांची मते या सर्व्हेक्षणादरम्यान घेण्यात आली. सर्वेक्षणासाठी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघ विधानसभा निहाय विभागून यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड (रॅन्डम सॅम्पलिंग) करण्यात आली आहे. याअंतर्गत लिंग, वय, जात, धर्म, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळे उत्पन्न गट, सरकारी योजनांचे लाभार्थी, नव मतदार असे निकष निश्चित केले होते. यामध्ये आगाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रश्न यावेळी विचारण्यात आले होते. यामधून राज्यातील मतदारांच्या मनात अजूनही भाजपच असल्याचे समोर आले आहे.
मतदान करताना आपल प्राधान्य कोणत्या पक्षाला असेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी जनतेचा कौल भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ला एकूण ४३.३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर इंडिया/ महाविकास आघाडीला ४५.७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. यासोबतच अपक्षांना ३.७ टक्के आणि १०.३ टक्के नागरिकांनी यापैकी नाही हा पर्याय निवडला आहे.
यावेळी मतदारांना लोकसभेच्या आगामी निवडणुकीत मतदान करताना आपण कोणत्या पक्षाला पसंती देणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा भाजपला ३३.६ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर त्या खालोखाल काँग्रेस पक्षाची निवड १८.५ टक्के मतदारांनी केल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १२.६ टक्के, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे १२.५ टक्के इतक्या लोकांची पसंती मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांना अनुक्रमे ३.९ टक्के आणि ४.९ टक्के असा कल मिळालेला दिसतो. वंचित बहुजन आघाडीला ३.६ टक्के असा कल मिळाला आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षांतर्गत फुटीचा परिणाम या दोन्ही पक्षांच्या मुळ मतांच्या विभाजनावर होणार आहे असे दिसते.
तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) १.४ टक्के, शेकाप ०.३ टक्के, वंचित बहुजन आघाडी ३.६ टक्के, एएयएमएयएम (AIMIM) ०.६ टक्के, स्वाभिमानी शेतकरी पक्ष ०.४ टक्के, प्रहार ०.३ टक्के, बहुजन विकास आघाडी ०.६ टक्के, भारत राष्ट्र समिती (केसीआर) ०.२ टक्के, आम आदमी पक्ष ०.५ टक्के आणि अपक्ष १.१ टक्के व इतर घटकांना ५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
या सर्व्हेक्षणात केंद्र सरकारच्या कामावर आपण समाधानी आहात का? असा थेट प्रश्न मतदारांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला ४४.५ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. यामुळे केंद्र सरकारच्या कमांवर लोकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. तर तब्बल ४० टक्के लोकांनी आपण समाधानी असल्याचे उत्तर दिले आहे. तर १५.१ टक्के लोकांनी सांगता येत नाही असा कल दिला आहे.
खासदारांच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारला असता ५०.६ टक्के लोकं खासदारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, तर ३२.४ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे . यामध्ये १७ टक्के लोकांनी सांगता येत नाही हा पर्याय निवडला आहे. सध्याच्या खासदारांच्या कामाच्या मूल्यमापनाचे हे आकलन खूप बोलके आहे. दोन पक्षात पडलेली फूट आणि विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला नवीन चेहरे बघायला मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको.
महत्वाचे म्हणजे या सर्वेक्षणात २०२४ च्या उमेदवारांबद्दल कल समजून घेण्यात आलेला नाही. मात्र सर्वेक्षण सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल कल सांगणारे आहे. त्यामुळे उमेदवार घोषित झाल्यावर, स्थानिक युती - आघाडीचे गणित निकालावर परिणाम करणारे ठरेल.
या सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षामध्ये महत्वाची बाब म्हणजे पक्ष म्हणून भाजपला क्रमांक एकची पसंती मिळाली आहे. पण सर्व मतदारसंघात जिंकण्यासाठी आवश्यक मते मिळविण्याचे आव्हान भारतीय जनता पक्षासमोर असणार आहे.
दुसरी बाब म्हणजे भाजपच्या मित्र पक्षांची ताकद मर्यादित असल्याचे या सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. परिणामी महाराष्ट्रात एनडीएसमोर महाविकास आघाडीचे आव्हान कायम असणार आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी मतदार सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल पुरेसे समाधानी नसल्याचे सांगतात, ही भारतीय जनता पक्ष आणि एनडीएसाठी धोक्याची घंटा असू शकते. पहिल्यांदा निवडून आलेल्या आणि तरुण खासदारांना अजून एक संधी द्यावी असेही लोकांचे म्हणणे दिसून येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.