एच. डी. रेवण्णा यांनी आपल्यावरचे आणि मुलगा प्रज्वल यांच्यावरचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.
बंगळूर : हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्यावर लैंगिक छळप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज (ता. ३) सकाळी दहा वाजता हुबळी येथे धजद (JDS) कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यात हकालपट्टीचा निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रज्वल यांचे वडील आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा तसेच प्रज्वल रेवण्णा यांना आता अटकेची भीती आहे. त्यामुळे अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचे समजते.
या प्रकरणामुळे निवडणुकीच्या राजकारणावरील संभाव्य परिणाम विचारात घेऊन प्रज्वल यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, शिमोग्यामध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) म्हणाले की, प्रज्वल रेवण्णा यांची धजदमधून हकालपट्टी करण्यात येईल. ज्यांनी चूक केली आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कोण कुठे आणि कधी जाणार, याची वाट पाहत बसायचे का? असा प्रश्न त्यांनी केला.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून धजदचे सुप्रिमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांनी नातू प्रज्वल यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिले होते. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, हासनमधील अनेक अश्लील व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह रस्त्यावर सापडला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. देवेगौडा यांच्या कुटुंबीयांनाही मान खाली घालावी लागणारी ही घटना आहे. तसेच धजद आमदारांनी स्वतः प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कारवाई करावी, त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
लैंगिक अत्याचाराच्या (Sexual Assault Case) आरोपांबाबत पीडित महिलेने रविवारी होळेनरसिंपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रेवण्णाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होईल, अशी भीती भाजप-धजद युतीच्या नेत्यांना वाटत आहे. या प्रकरणामुळे धजदमध्येही तणाव निर्माण झाला असून, गुरुमितकलचे धजदचे आमदार शरणगौडा कुंडकूर हे या प्रकरणामुळे खजिल झाले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान आणि धजदचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांना पत्र लिहून प्रज्वल रेवण्णा यांची हकालपट्टीची मागणी केली आहे.
भाजपनेही या प्रकरणाचा बचाव केलेला नाही. कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. कायद्यासमोर कोणीही मोठे नाही. एसआयटीच्या तपासात सत्य समोर येईल. दोषींना शिक्षा व्हावी, असे विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले. तर माजी मंत्री सी. टी. रवी म्हणाले की, या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होईल, असे म्हणता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले. एसआयटीच्या तपासातून सत्य बाहेर येईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी म्हटले आहे.
बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री डॉ. परमेश्वर म्हणाले, एसआयटी टीम या खटल्याच्या संदर्भात पेन ड्राईव्हसह सर्व साक्षीदार तपासत आहेत. गरज भासल्यास प्रज्वल रेवण्णाला जर्मनीतून परत आणले जाईल. एसआयटी अधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ एफएसएलकडे पाठवण्यात येणार आहेत.
एच. डी. रेवण्णा यांनी आपल्यावरचे आणि मुलगा प्रज्वल यांच्यावरचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. सरकारला याची चौकशी करू द्या. कायद्यानुसार काय ते होऊ द्या, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, आपला मुलगा प्रज्वल पळून गेलेला नाही. चौकशीसाठी बोलावले तर मी येईन. चौकशी करून कायदेशीर कारवाई करा. प्रज्वलला जर्मनीत जायचे होते. बोलावले तर तो येईल.
‘प्रज्वल रेवण्णा यांच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल. लैंगिक हिंसाचारातील पीडित महिला घाबरल्या असतील, तर सरकार त्यांना सुरक्षा पुरविल. आम्ही या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. तपास पथकात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपास अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री डॉ. परमेश्वर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.