भाजपचा ४३ वा वाढदिवस साजरा होत आहे. १९८० मध्ये पक्षाची स्थापना झाली. सध्या देशाचे संपूर्ण राजकारण हे भाजपभोवती फिरत आहे.
आजच्या भारतीय जनता पक्षाला मित्रपक्षांची गरज नाही, अशी स्थिती आहे. त्याचे सर्वस्वी श्रेय जरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे असले, तरी त्यांनी पक्षाच्या संस्थापकांचे विशेषतः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विशेष आभार मानायला हवेत.
भाजपचा ४३ वा वाढदिवस साजरा होत आहे. १९८० मध्ये पक्षाची स्थापना झाली. सध्या देशाचे संपूर्ण राजकारण हे भाजपभोवती फिरत आहे. त्यामुळे त्याबद्दल बरेच काही लिहिले गेले. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या पक्षाचे सलग दुसरे सरकार पूर्ण वेळेचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या शेवटच्या वर्षात पदार्पण करीत आहे. पुढील वर्षी या वेळेपर्यंत कदाचित मतदानाच्या दोन फेऱ्याही झालेल्या असतील. आजच्या देशभरातील एकूण घडामोडी पाहिल्यास आणि विरोधी पक्षांच्या सर्व हालचाली असूनही भाजपची स्थिती जवळपास अभेद्य अशीच आहे.
भाजपच्या संस्थापकांनी जनता पक्षाच्या राखेतून हा पक्ष स्थापन केला. त्यात कालपरत्वे बदल होत आला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आता जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात त्यात बरेच बदल झाले, तसेच तो विकसितही झाला आहे. अडवानी आणि वाजपेयी यांनी स्थापन केलेला पक्ष कसा बदलला, हेही पाहणे रोचक ठरेल.
पक्षाच्या एकूण वाटचालीकडे पाहत असता सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाची वैचारिक एकता बदललेली नाही. संस्थापक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस म्हणूया) विचारसरणीशी ठाम राहिलेले आहेत. मोदी-शहा यांच्या टीमने एनडीए-२ अंतर्गत जे काम केले, त्यात बाहेरून आलेले, तसेच पक्षाचे सर्व प्रमुख नेते एकाच वैचारिक नर्सरीतून आले आहेत.
खरे पाहता प्रस्थापितांकडे कधीच बहुमत नव्हते. वैविध्यपूर्ण युती एकत्र ठेवत सत्ता राखण्यासाठी त्यांना त्यांच्या विचारसरणीतील काही आवश्यक घटकांना पाठीशी घालावे लागले. उदा : काश्मीरचा विशेष दर्जा (कलम ३७०), राम मंदिर आणि समान नागरी कायदा. संस्थापकांच्या वारसांनी बहुमत मिळविले आणि वरील मुद्दे पुढे आणले. त्यापाठोपाठ तोंडी तलाक, विवाह आणि बहुपत्नीत्वाचे किमान वय याकडे लक्ष वळविले आहे. १९७७ मध्ये जनता पक्षाचा प्रयोग झाला. त्यातून एक वैचारिक पक्ष निर्मिण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यातील पाच प्रमुख घटकांपैकी भारतीय जनसंघ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ), समाजवादी पक्ष, भारतीय लोक दल (चरणसिंग यांच्या नेतृत्वाखालील) आणि बाबू जगजीवन राम यांचा लोकशाहीसाठी काँग्रेस (सीएफडी) हे आज अस्तित्वात नाहीत, त्यापैकी नव्या अवतारात भाजप उदयास आला. भारतीय जनसंघाचा भारतीय जनता पक्ष म्हणून पुनर्जन्म झाला.
गांधी कुटुंबाचा द्वेष करणे हाच अजेंडा राबविला जात असतानाही जर मोदी आणि शहा यशस्वी झाले असतील तर त्यांनी संस्थापकांचे, विशेषत: वाजपेयींचे आभार मानायला हवेत. भाजपने पाय भक्कमपणे रोवत असताना विश्वनाथ प्रताप सिंह यांना पाठिंबा देण्याची मोठी चाल खेळली होती. मात्र, भाजपचा पाठिंबा अल्पायुषी ठरला. तरीही काँग्रेसला कमकुवत करून सत्तेपासून दूर ठेवण्याचा तो एक डावपेचाचा भाग ठरला. ते कितपत आव्हानात्मक होते, हे पुढील घडामोडींवरून लक्षात येते. त्यांनी भाजपविरोधी आघाडी उघडली. चंद्रशेखर (१९९०-९१)पासून ते एच. डी. देवेगौडा (१९९६-९७) आणि इंद्रकुमार गुजराल (१९९७-९८) यांना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देताना ‘धर्मनिरपेक्ष’ शक्तींना एकत्र ठेवण्याचा आणि जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्यात यश मिळविले.
अडवानी आणि वाजपेयी यांनी सत्तेचा सोपान गाठण्यासाठी समविचारी गटांची मोट बांधली आणि तेथे भाजपची राजकीय अस्पृश्यता संपली. आता फरक एवढाच झाला आहे, की भाजप स्वतःहून एवढा ताकदवान झाला आहे, की त्याला यापैकी कोणाचीही गरज उरलेली नाही. शिरोमणी अकाली दल आणि शिवसेनेचीही नाही. त्यातील एकाला त्यांनी टाकला, तर दुसऱ्याला तोडला. असे असले तरी काही जाती आधारित पक्षांसह काही स्थानिकांना सोबत घेतले जाऊ शकते. अण्णाद्रमुक आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे सद्यस्थितीत दोन अपवाद आहेत. पण, शिंदे सेनेची शक्यता किती टिकाऊ आहे, त्यावर पुढील वाटचाल ठरेल.
जानेवारी १९८४ मध्ये राजीव लाटेत पक्षाच्या दोन जागा कमी झाल्या होत्या, तेव्हा मी देशातील कडवट विरोधकांवरील कव्हर स्टोरीसाठी वाजपेयी यांची मुलाखत घेतली होती. त्यात तरुणाई हे राजीव यांच्या बलस्थानांपैकी एक असल्याचे त्यांनी मान्य केले होते आणि त्या वेळी आपण तरुण नेत्यांच्या शोधात आहेत, असे सांगितले होते. त्यांनी अरुण जेटली आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख केला होता. सद्यस्थिती अशी आहे, की संस्थापकांच्या काळात ओळखले जाणारे अनेक तरुण नेते आता पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. नरेंद्र मोदी हे त्यापैकीच एक. सध्याची स्थिती पाहत असताना हिंमता बिस्वा सरमा, योगी आदित्यनाथ आणि कदाचित देवेंद्र फडणवीस अशी काही नावे समोर येताहेत. पण, त्यांचा परिघ किती विस्तारणार, हे मात्र सांगता येत नाही. एक मात्र खरे- एकूण कार्यशैली, वाटचाल पाहिल्यास आपली शैली बदलत भाजपने केलेले काम पक्षाच्या प्रगतिपथावर आहे.
मोदींचे ‘पीएमओ’ अधिक शक्तिशाली
सध्या भाजप ज्या ठिकाणी पोचलेला आहे, त्याला तुम्ही पक्षाची उत्क्रांती म्हणू शकता. पक्षात आता सर्वशक्तिमान व्यक्तिमत्त्व आहेत. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारचे पूर्ण समर्थन करते आहे आणि त्याच्या सर्व कृतींचा आनंद साजरा करते. वाजपेयी अनेकदा बोलताना ‘राजनीती सौदा नहीं है’ म्हणायचे. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी व्यवहारातील अव्यवस्थित राजकारणाची स्वतःची आवृत्ती परिपूर्ण केली आहे. वाजपेयी यांनी एक मजबूत, केंद्रीकृत पंतप्रधान कार्यालय बांधले होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावर नियमितपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असे. मोदी यांचे ‘पीएमओ’ खूप शक्तिशाली आहे आणि त्याबाबत कोणीही तक्रार करीत नाही, हा फरक आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीत इतर विचारसरणीची एक व्यक्ती (जॉर्ज फर्नांडिस) होती.
अनुवाद : प्रसाद इनामदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.