पुणे : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. लातूर, उस्मानाबाद व लगतच्या सोलापूर व नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेला लिंगायत समाज व शिवराज पाटील चाकूरकर यांना मानणारा वर्ग तसेच आगामी सहा एक महिन्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश झाल्याचे समजते.
अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशाने मराठवाड्यातील आणखी एक कॉँग्रेस घराणे भाजपच्या वळचणीला येऊन बसले आहे. नांदेड जिल्ह्यातील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कांहीच दिवसांपूर्वी भाजप प्रवेश करुन राज्यसभा पदरात पाडून घेतली होती. त्यानंतर लगेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनीही भाजपत प्रवेश घेतला होता. बसवराज हे चाकूरकर यांचे मानसपुत्र मानले जातात. त्यामुळे त्यांच्यानंतर चाकूरकर घराणेही भाजपत जाईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. ती आज खरी ठरली आहे. शिवराज पाटील यांची संपूर्ण कारकीर्द कॉँग्रेस पक्षात गेली. लातूरचे ते सलग सात वेळा खासदार राहिले.
केंद्रात गृहमंत्री, संरक्षणमंत्री, लोकसभा सभापती, पंजाबचे राज्यपाल आदी महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्या रुपाताई निलंगेकर यांच्याकडून पराभूत झाले. पराभूत होऊनही कॉँग्रेसने त्यांना गृहमंत्री हे दोन क्रमांकाचे पद बहाल केले. एवढी त्यांची गांधी कुटुंबाशी जवळिक होती. मात्र नंतर देशात व लातूर मतदारसंघात भाजपचा उदय झाला. २००९ साली लोकसभा मतदारसंघाची फेररचना झाली आणि हा मतदारसंघ राखीव झाला. त्यानंतर चाकूरकरही जिल्ह्यातील राजकारणाबाहेर फेकले गेले. एकेकाळी या जिल्ह्यात चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर व विलासराव देशमुख ही त्रिमूर्ती राज्य व देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी होती. त्यांच्यामुळेच हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या भाजपकरणाची सुरुवात निलंगेकर यांचे नातू संभाजी पाटील यांनी केली. त्यांनी थेट आजोबांनाच आस्मान दाखवत या राजकारणाची सुरुवात केली. आज बहुतांश निलंगेकर कुटुंब भाजपमध्ये स्थिरावले आहे.
चाकूरकर यांची बदलत्या राजकारणात पिछेहाट झाली असली तरी लिंगायत समाजात आजही त्यांना मानाचे व प्रतिष्ठेचे असे स्थान आहे. त्यांच्या रुपाने लातूर शहर व ग्रामीण या मतदारसंघात काँग्रेसच्या देशमुखांच्या विरोधातही तगडा उमेदवार लाभल्याने त्या घराण्याला डॅमेज करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. बसवराज पाटील यांच्या रुपाने औसा, उमरगा, तुळजापूर आधीच बळकट झाले आहे. मात्र अर्चना पाटील यांच्यामुळे चाकूरकर यांना मानणारा वर्ग भाजपला जोडता येणार आहे. लातूर, उस्मानाबाद व नांदेड येथील भाजप व महायुतीच्या उमेदवारांना या प्रवेशाचा फायदा होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.