उज्ज्वलकुमार
पाटणाः बिहार केडरचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) डॅशिंग अधिकारी आणि महाराष्ट्राचे भूमिपुत्र शिवदीप लांडे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ निर्माण झाली आहे. लांडे हे २००६ च्या तुकडीचे अधिकारी असून ते पूर्णिया रेंजचे महासंचालक आहेत. मध्यंतरी त्यांची पूर्णिया येथून तिरहूत रेंज ( मुझफ्फरपूर) येथे बदली करण्यात आली होती.
लांडे यांचा स्थानिक पोलिस दलामध्ये मोठा दबदबा होता. एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने राजीनामा देण्याची मागील दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. याआधी २०१९ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही वैयक्तिक कारण पुढे करत राजीनामा दिला होता. त्यांचीही दरभंगा (ग्रामीण) येथे पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. लांडे यांनी समाजमाध्यमावरून राजीनाम्याची घोषणा केली. शिवदीप यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘‘ मागील अठरा वर्षे मी राज्याची सेवा केली असून नेहमीच आपल्या कामाला प्राधान्य दिले आहे. मी पोलिस सेवेचा राजीनामा दिला असला तरीसुद्धा मी कर्मभूमी बिहारमध्ये काम करत राहीन.’’
क्रशरचालकांवर कारवाई
रोहतास जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना लांडे यांनी बेकायदा स्टोन क्रशरविरोधात जोरदार कारवाई सुरू केली होती. काही राजकीय नेत्यांच्या मालकीच्या क्रशरला त्यांनी टाळे ठोकले होते. पाटण्यात पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी मोठी लोकप्रियता मिळविली होती. विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना त्यांनी चांगलाच धडा शिकविला होता. अररियामध्येही पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले. कोसी रेंजचे उपमहानिरीक्षक म्हणूनही त्यांनी लक्षवेधी काम केले आहे.
मागील काही दिवसांमध्ये एकापाठोपाठ एक दोन आयपीएस अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे राजीनामा देणे बिहारसाठी काही चांगले लक्षण म्हणता येणार नाही. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला हवा. सातत्याने अशा घटना घडत राहिल्याने लोकांपर्यंत चुकीचा संदेश जातो.
- अमिताभकुमार दास, निवृत्त आयपीएस अधिकारी
...म्हणून मिश्रांचा राजीनामा
काही दिवसांपूर्वी राजीनामा देणाऱ्या काम्या मिश्रा या मूळच्या ओडिशाच्या रहिवासी आहेत. राज्यात मध्यंतरी एका राजकीय नेत्याच्या वडिलाची निर्घृण हत्या झाली होती, त्या प्रकरणाचा ज्या पद्धतीने तपास झाला होता त्यावर मिश्रा या कमालीच्या नाराज होत्या. त्यांचे पती अवधेश सरोज दीक्षित हे देखील आयपीएस अधिकारी असून तेही बिहारमध्ये कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.