प्रज्वल यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटी अधिकाऱ्यांनी व्हिडिओतील काही महिलांना त्यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.
बंगळूर : लैंगिक अत्याचार आणि अश्लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना कोणत्याही क्षणी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एसआयटी अधिकाऱ्यांनी आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णा आणि माजी मंत्री, आमदार एच. डी. रेवण्णा यांच्या बंगळूर, हासन जिल्ह्यातील घरांवर आणि फार्महाऊसवर काल (ता. ३) पहाटेपासून छापे टाकून तपासणी केली.
दरम्यान, देशभरात प्रज्वलविरोधात संतापाची लाट उसळली आहे. लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर एसआयटीचे अधिकारी परदेशात असलेल्या प्रज्वलला अटक करून भारतात आणण्याच्या तयारीत आहेत.
प्रज्वल सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहे. त्याला या प्रकरणात उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ देऊ शकत नसल्याची माहिती यापूर्वीच एसआयटीने दिली आहे. त्यामुळे आता त्याला कोणत्याही क्षणी अटक करणे एसआयटीच्या अधिकाऱ्यांसाठी अपरिहार्य बनले आहे.
प्रज्वल यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटी अधिकाऱ्यांनी व्हिडिओतील काही महिलांना त्यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. यातील एका महिलेने एसआयटी अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली आधीच नोंदवलेल्या एफआयआरमध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदवला. अनेक आमिषे दाखवून प्रज्वलने तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने न्यायाधीशांना सांगितले.
याप्रकरणी आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी एका तक्रारीत गंभीर कलमे नोंदवण्यात आली असून, त्याअंतर्गत प्रज्वलची अटक निश्चित आहे. दुसऱ्या एफआयआरमध्ये नोंदवलेले कलम अधिक कठोर आहे. दुसऱ्या एफआयआरमध्ये प्रज्वल हा एकमेव आरोपी आहे. एच. डी. रेवण्णा हेही पहिल्या तक्रारीत आरोपी होते. एच. डी. रेवण्णा जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. प्रज्वल भारतात येताच त्याला अटक करण्यासाठी एसआयटी सज्ज आहे. त्याला यापूर्वीच लुकआऊट नोटीस बजावली आहे.
शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता एसआयटी अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रज्वलच्या फार्महाऊसवर छापा टाकला. पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने होळेनरसिंपूर येथील पडुवलाहिप्पेच्या फार्महाऊसची झडती घेतली. पोलिसांच्या दोन पथकांनी हासन येथे येऊन छापा टाकला. आज होळेनरसिंपूरच्या रेवण्णांचे निवास आणि हासनमधील प्रज्वल यांच्या निवासाची पाहणी केली. ही निवासस्थाने सील केली जाण्याची शक्यता आहे.
धमकावून महिलेवर वारंवार अत्याचारप्रकरणी दोषी ठरल्यास किमान दहा वर्षे कारावास किंवा जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. गुन्हेगारी हेतूने धमकावणे, लैंगिक सुखाच्या मागणीसाठी सक्तीसाठी कमाल तीन वर्षे कारावास, गुन्हेगारी हेतूने महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल तीन वर्षे शिक्षा, रेकॉर्डिंग आणि महिलेची खासगी बाब तिच्या इच्छेविरुद्ध पाहणे यासाठी कमाल सात वर्षे शिक्षा, अशी कायद्यात तरतूद आहे.
एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी बसवानगुडी येथील घर, होळेनरसिंपूर येथील पडुवलाहिप्पे येथील फार्महाऊस आणि त्याचे बंधू सूरज रेवण्णा यांच्या गनिकडा येथील फार्महाऊसवर तीन ठिकाणी छापे टाकले. ३० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापे टाकून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. या छाप्याचे नेतृत्व पोलिस अधीक्षक सीमा लाटकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.