कोलकता, ता. १२ (पीटीआय): संदेशखाली मुद्यावरून ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आणि सभागृहात गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या सहा आमदारांना आज निलंबित करण्यात आले. यात विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी, अग्निमित्र पाल, शंकर घोष, तापसी मंडल, बंकिम घोष आणि मिहीर गोस्वामी यांचा समावेश आहे. या सहा जणांवर उर्वरित अधिवेशनाचा कालावधी किंवा तीस दिवसांसाठी त्यापैकी जे अगोदर लागू होईल, त्यानुसार होईल.
विधानसभेत आमदारांचे वर्तन बेशिस्त आणि गोंधळाचे असल्याने निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे. राज्य विधानसभा नियम ३४८ नुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा प्रस्ताव पश्चिम बंगालचे संसदीय कामकाज मंत्री सोवनदेव चट्टोपाध्याय यांनी मांडला. यावेळी निलंबनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. दुसरीकडे विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, भाजपने नेहमीच महिलांच्या सन्मानार्थ आवाज उठविला आहे. संदेशखाली मुद्द्यावर आम्ही सभाध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन भूमिका मांडली. मात्र आम्हाला विधानसभेच्या अन्य काळासाठी निलंबित केले. हे निलंबन आमच्यासाठी भेट आहे. कारण आम्ही आपल्या माता-भगिनींच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
राज्यपालांची संदेशखालीला भेट
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांचे आज सकाळी केरळहून कोलकता येथे आगमन होताच ते थेट उत्तर २४ परगना जिल्ह्यातील संदेशखालीकडे रवाना झाले. या प्रकरणावर राज्यपालांनी अगोदरच स्थितीजनक अहवाल मागितला आहे. बोस म्हणाले, संदेशखाली घटनेची माहिती कळताच आपण केरळचा दौरा रद्द केला. संदेशखालीची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. आपण संदेशखालीला जात आहोत आणि तेथील वास्तविक परिस्थिती जाणून घेणार आहोत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यपाल हे केरळ येथील बंगाल उत्सव सोहळ्यात सामील होण्यासाठी गेले होते.
संदेशखाली येथे काय घडले?
पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात संदेशखाली येथे शनिवारी महिलांचे आंदोलन झाले. तृणमूल कॉंग्रेसचे फरार नेते शेख शहाजहॉं आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यासाठी महिलांनी मोर्चा काढला होता. रेशन गैरव्यवहारप्रकरणात शेख शहाजहॉं याचे नाव असून ईडीच्या पथकाने छापे घातल्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला होता.
स्थानिक महिलांचा मोर्चा पाहता संदेशखाली येथे कलम १४४ लागू करण्यात आला. तृणमूल कॉंग्रेसचे नेते शहाजहॉं आणि त्याची टोळी महिलांचे शोषण करण्याबरोबरच जमीन हडप करत असल्याचा आरोप महिला आंदोलकांनी केला होता. या मोर्चाविरोधात तृणमूल समर्थक देखील रस्त्यावर उतरले. त्यावेळी धुमश्चक्री झाली. संदेशखाली येथे मानवाधिकार हक्काचे उल्लंघन होत असल्याचा आरेाप भाजपने केला आहे.शहाजहॉं हा महिनाभरापासून फरार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.