नवी दिल्ली : देशात लोकशाही आणि राज्यघटना धाब्यावर बसवून हुकूमशाही सुरू आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) आज काँग्रेसच्या (Congress) १३७ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने केला. दरम्यान, कॉंग्रेस मुख्यालयात पक्षाच्या ध्वजवंदन कार्यक्रमात कॉंग्रेस पक्षाचा झेंडा खाली पडण्याची नामुष्की ओढवली. सोनिया गांधींनी लगेच झेंडा सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकाराची पक्षाच्या पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. याची जबाबदारी सेवादलाची की काँग्रेस संघटनेची यावरून कुजबूज पक्षात सुरू असल्याचे समजते.
काँग्रेसच्या २४ अकबर मार्ग या मुख्यालयामध्ये काँग्रेस स्थापनादिनाचा मुख्य कार्यक्रम झाला. राहुल गांधी, प्रियांका गांधी, संघटना सरचिटणीस वेणुगोपाल, आनंद शर्मा यांच्यासह पक्षाचे बहुतांश नेते यावेळी उपस्थित होते. असंतुष्ट गट मानल्या जाणाऱ्या जी-२३ चे नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांची अनुपस्थिती बोलकी ठरली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे ध्वजवंदन विस्कळित झाल्याने कॉंग्रेसला सोशल मीडियावर टीका सहन करावी लागली. सोनिया गांधींनी दोरी खेचूनही ध्वज फडकविला जात नसल्याने तेथे उपस्थित असलेल्या सेवादल कार्यकर्त्याने दोरी ओढली. या झटक्यामुळे काँग्रेसचा झेंडा सुटून सोनिया गांधींच्या हातावर पडला. या प्रकारामुळे सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते अवाक् झाले. त्यानंतर पुन्हा नव्याने ध्वजवंदन करण्यात आले.
अर्थात यासाठीही ध्वजस्तंभावर काँग्रेसचा झेंडा लावताना काँग्रेस कार्यकर्त्यांची दमछाक झाली. उंच ध्वजस्तंभावर प्रथम एक कार्यकर्ता अर्ध्यावरच पोहोचू शकला. तर त्यानंतर चढलेल्या दुसरा कार्यकर्त्याला किमान तेवढेही अंतर गाठता आले नाही. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे अखेर शिडी लावून झेंडा लावावा लागला. यानंतर पुन्हा ध्वजवंदन झाले. परंतु, प्रियांका गांधी या प्रकारामुळे संतप्त झाल्या या प्रकाराबाबत त्यांनी पक्षाच्या नेत्यांनाही खडसावले आणि त्याची पूर्वतयारी का केली नव्हती, अशी विचारणा केल्याचे कळते.
केंद्राकडून इतिहास नाकारला जातोय: सोनिया
दरम्यान, या कार्यक्रमानंतर सोनिया गांधींनी व्हिडिओ चित्रफितीद्वारे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना संदेश देताना केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चढवला. सोनिया गांधींनी केंद्र सरकारवर शरसंधान करताना सोनिया गांधींनी केंद्र सरकार इतिहास नाकारत असून गंगा जमुना संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा प्रहार केला.
नागरिकांमध्ये असुरक्षितता आणि भयाचे वातावरण असून लोकशाही आणि राज्यघटना धाब्यावर बसवून हुकूमशाही सुरू आहे, असा घणाघाती आरोपही केला. काँग्रेस केवळ राजकीय पक्ष नव्हे तर आंदोलन आहे. ज्या लोकांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता त्यांना याचे महत्त्व कधीही कळणार नाही. आज भारताचा मजबूत पाया दुबळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असाही टोला सोनिया गांधींनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.