पृथ्वीवरील सर्वात वेगवान मानव म्हणून जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला ओळखले जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकांची हॅट्ट्रिक नोंदविलेल्या बोल्टला वेगाचा अनभिषिक्त सम्राट अशी पदवी बहाल करण्यात आली आहे. मात्र, त्याला टक्कर देईल असा एक धावपटू कर्नाटकच्या मंगळुरू येथे झालेल्या पारंपरिक म्हैस शर्यतीवेळी आढळून आला आहे.
श्रीनिवास गौडा असं या भारतीय धावपटूचं नाव असून तो कर्नाटकच्या मुडबिद्री येथील स्थानिक रहिवासी आहे. काद्री येथील धान शेतात कंबाला शर्यत पार पडली. यावेळी गौडाने 142.5 मीटर अंतर हे अवघ्या 13.62 सेकंदात कापले आणि पाहणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. या गोष्टीची सगळीकडे चर्चा सुरू झाल्यानंतर आता त्याची तुलना उसेन बोल्टशी करू लागले आहेत.
सोशल मीडियावर या गोष्टीची चर्चा सुरू असताना प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या घटनेची दखल घेत हा धावपटू आपल्या देशाला ऑलिम्पिक पदक जिंकवून देऊ शकतो. या खेळाडूला जर योग्य प्रशिक्षण दिले तर तो अॅथलेटिक्समध्ये देशाचे नाव उज्ज्वल करू शकतो. क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी त्याला ट्रेनिंग द्यावे, नाहीतर आम्ही त्याला ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करू. श्रीनिवासमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची क्षमता आहे, अशा आशयाचे ट्विट केले.
क्रीडामंत्र्यांनी धाडले निमंत्रण
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटची दखल घेत क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी श्रीनिवासला भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे चाचणीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती दिली. साईमध्ये त्याची ट्रायल घेतली जाईल, तसेच त्याला प्रशिक्षण देण्यात येईल. अॅथलेटिक्समध्ये खूप कमी भारतीय सहभागी होतात, मात्र, श्रीनिवाससारखे टॅलेंट आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे.
तसेच साई संस्थेनेही आपल्या ट्विटर अकाउंटवरून श्रीनिवासची बंगळूर येथील केंद्रात सोमवारी चाचणी घेण्यात येईल. त्यासाठी त्याचे रेल्वे तिकीट आरक्षित करण्यात आले आहे. आम्ही विविध खेळांमधील टॅलेंटच्या शोधात असून त्यांना योग्य सन्मान देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे म्हटले आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेने श्रीनिवास गौडाशी संपर्क साधत त्याचे मत जाणून घेतले. त्यावेळी श्रीनिवास म्हणाला, लोक माझी तुलना उसेन बोल्टशी करत आहेत. पण तो विश्वविजेता धावपटू आहे. तर मी म्हशींच्या शर्यतीत धावणारा साधा धावपटू आहे.
दरम्यान, 1 फेब्रुवारीला काद्री येथील धान शेतात झालेल्या कंबाला शर्यतीमध्ये श्रीनिवासने 142.5 मीटर अंतर हे अवघ्या 13.62 सेकंदात पूर्ण केले. या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सर्वांच्या नजरा श्रीनिवासकडे वळल्या आहेत.
काय आहे ही कंबाला शर्यत?
कर्नाटक राज्यातील दक्षिण भागात म्हशींची शर्यत दरवर्षी आयोजित केली जाते. याचा कर्नाटकच्या पारंपरिक मैदानी खेळामध्ये समावेश करण्यात येतो. यामध्ये म्हशींच्या जोड्या शैतातून पळविण्यात येतात. या म्हशींच्या जोडीबरोबर एक जॉकीही असतो. जो सर्वात कमी वेळात हे ठराविक अंतर पूर्ण करेल, त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात येते. दक्षिण कर्नाटकच्या कन्नड आणि उडुपी जिल्ह्यातील स्थानिक तुळवा जमीनदार आणि अनेक प्रतिष्ठित कुटुंबांच्या वतीने ही स्पर्धा भरविण्यात येते. या शर्यतीला कंबाला शर्यत म्हणून ओळखले जाते.
काद्री येथे झालेल्या एका कंबाला शर्यतीमध्ये श्रीनिवासन गौडाने 100 मीटर अंतर अवघ्या 9.55 सेकंदात पूर्ण केले. जगातील सर्वोत्तम धावपटू असलेल्या उसेन बोल्टचा 9.58 सेकंदाचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.