कोटा शहराला देशाची शैक्षणिक राजधानी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. जेईई, नीट आणि इतर कित्येक परीक्षांची तयारी करण्यासाठी देशभरातून विद्यार्थी याठिकाणी येतात. अर्थात, गेल्या काही वर्षांपासून हे शहर विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी देखील चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच एका 18 वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. यानंतर आता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत कोटा प्रशासन जागं झालं आहे. विद्यार्थ्यांना मानसिक आधार आणि सुरक्षा देण्यासाठी कोटा प्रशासनाने सर्व हॉस्टेल आणि पीजींमध्ये स्प्रिंग-लोडेड सीलिंग फॅन बसवण्याचे आदेश जारी केले आहेत.
कोटा जिल्हाधिकारी ओम प्रकाश बंकर यांनी याबाबत आदेश दिला आहे. "विद्यार्थ्यांना मानसिक आधार आणि सुरक्षा देण्यासाठी, आणि आत्महत्येच्या घटना टाळण्यासाठी कोटा शहरातील सर्व हॉस्टेल आणि पीजींमध्ये असणाऱ्या सीलिंग फॅनमध्ये सिक्युरिटी स्प्रिंग डिव्हाईस बसवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. सर्व हॉस्टेल आणि पीजी संचालकांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत." असं यात म्हटलं आहे. (Students Suicide)
सोबतच, डिसेंबर 2022 मध्ये दिलेल्या आदेशानुसार सर्व विद्यार्थ्यांना आठवड्याची सुट्टी देणे, एका क्लासमध्ये जास्तीत जास्त 80 विद्यार्थी ठेवणे, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मानसशास्त्रीय मूल्यमापन अनिवार्य करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत सर्व कोचिंग क्लासेसना निर्देश देण्यात आले आहेत.
जे कोचिंग क्लासेस किंवा हॉस्टेल या आदेशांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर जप्तीची आणि इतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही या आदेशात म्हटलं आहे.
स्प्रिंग-लोडेड फॅन्स हे विशिष्ट प्रकारचे सीलिंग फॅन्स असतात. कोणत्याही प्रकारचा भार पडताच हे फॅन सीलिंगपासून वेगळे होतात, आणि अलगदपणे खाली येतात. यासोबतच यामध्ये असलेले सेन्सर हे अलार्म वाजवतात. यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचतो, आणि इतरांना याबाबत माहिती मिळते.
अशा प्रकारचा आदेश यापूर्वी 2017 साली देखील कोटामध्ये देण्यात आला होता. त्यामुळे कित्येक हॉस्टेलमध्ये अशा प्रकारचे फॅन आधीपासून बसवण्यात आले आहेत. आता बाकी हॉस्टेल आणि पीजींनाही याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
कित्येक तज्ज्ञांनी मात्र या निर्णयाचा निषेध केला आहे. कोटा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अमानवीय असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अशा प्रकारच्या आदेशांमुळे आधीच कमकुवत मानसिक स्थितीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा ताण आणखी वाढू शकतो, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली.
कोटा शहरात यावर्षी आतापर्यंत तब्बल 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या आठ वर्षांतील आकडेवारीच्या तुलनेत या वर्षातील सर्वाधिक आत्महत्या आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी हे जेईई आणि नीट परीक्षांच्या तयारीसाठी कोटामध्ये आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.