Srinagar News : नंदनवनातील ‘हसीन वादियाँ’ यंदा सुनीसुनी; पर्यटकांची बर्फात खेळण्याची इच्छा अपुरीच

काश्‍मीर खोऱ्यात यावर्षी तुरळक हिमवर्षाव झाला आहे. बर्फातील स्किईंग आणि अन्य साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेले गुलमर्ग हे तर अक्षरशः कोरडेच आहे.
Gulmarg
Gulmargsakal
Updated on

श्रीनगर - झेलम, चिनाब, लिडर आदी नद्यांचे खळाळते पाणी, हिरवीगार वनराई आणि हिमाच्छादित पर्वत असे निसर्गाचे भरभरून दान मिळालेल्या काश्‍मीरमधील थंड हवेचे ठिकाण असलेले गुलमर्ग हे पर्यटकांचे आवडते ठिकाण. तेथील बर्फातील विविध खेळ हे मुख्य आकर्षण असते. पण यंदा गुलमर्ग बर्फाविना कोरडे पडले असून पर्यटकांविना शांत आहे.

काश्‍मीर खोऱ्यात यावर्षी तुरळक हिमवर्षाव झाला आहे. बर्फातील स्किईंग आणि अन्य साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेले गुलमर्ग हे तर अक्षरशः कोरडेच आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी आरक्षण रद्द केले आहे. बर्फच नसल्याने गुलमर्गमध्ये हिवाळ्यातील सर्व व्यवसाय थंड पडले आहेत. याचा मोठा फटका पर्यटनावर अवलंबून हॉटेल उद्योग आणि लहान-मोठ्या व्यावसायिकांना बसला असून काश्‍मीर खोऱ्यातील नागरिक चिंतेत आहेत. बर्फच नसल्याने पर्यटकांचा ओघही कमी झाला.

पर्यटकांची संख्या ६० टक्क्यांनी घटली

सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जानेवारीत ९५ हजार ९८९ पर्यटकांनी गुलमर्गला भेट दिली. त्यात ५४७ परदेशी नागरिकांचा समावेश होता. यावर्षीची आतापर्यंतची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. मात्र गुलमर्गमध्ये आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांपेक्षा कमी पर्यटक आले.

तरुणांना चिंता

गुलमर्गमध्ये यापूर्वीही अशी स्थिती उद्गभवली होती, परंतु यावेळी पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे, असे या व्यवसायाशी संबंधित लोकांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून गुलमर्गला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे गुलमर्ग आणि आसपासच्या साहसी पर्यटनात गुंतवणूक करण्यास स्थानिक तरुणांचा ओढा वाढत आहे. पण त्यांचा व्यवसाय प्राथमिक अवस्थेत असून, यंदा त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हलक्या हिमवर्षावाचा अंदाज

काश्‍मीरमध्ये हिवाळ्यातील गोठविणाऱ्या थंडीच्या काळाला ‘चिलाई-कलान’ म्हटले जाते. हा कालावधी ३१ जानेवारी रोजी पूर्ण होत आहे. यंदा याकाळात काश्मीरमध्ये मोठी बर्फवृष्टी झालेली नाही आणि २४ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता नाही. ‘‘येत्या काही दिवसांत हलक्या हिमवर्षाव होण्याचा अंदाज आहे,’’ असे काश्मीरमधील हवामान विभागाचे संचालक मुख्तार अहमद यांनी सांगितले.

आम्ही सर्वजण हिमवृष्टी होण्याची वाट पाहत आहोत, पण गुलमर्गला बर्फापेक्षाही खूप काही पाहण्यासारखे आहे. गुलमर्ग अजूनही चैतन्यदायी आहे. आम्ही यापूर्वीही अशी स्थिती पाहिली आहे. लवकरच बर्फ पडेल, अशी आम्हाला आशा आहे.

- राजा वसीम, सीईओ, गुलमर्ग विकास प्राधिकरण

मी नेहमी पाहतो, त्यापेक्षा यंदाचे गुलमर्ग वेगळेच आहे. मी अनेकदा हिवाळ्यात गुलमर्गला येतो, पण बर्फविरहीत गुलमर्ग मी पहिल्यांदाच पाहत आहे.

- आर. कुमार, पर्यटक, हरियाना

हिवाळ्यातील काश्‍मीरमधील स्थिती

  • गुलमर्गमध्ये २०१८ मध्येही यंदाप्रमाणेच परिस्थिती होती. परंतु आताच्या तुलनेत त्यावेळी पर्यटकांचा ओघ कमी होता

  • काश्मीर खोऱ्यात यंदा हिवाळ्यातील काळात डिसेंबरमध्ये ७९ टक्के कमी बर्फ पडला

  • गुलमर्गमध्ये यावर्षी आतापर्यंत अत्यंत माफक हिमवृष्टी झाली

  • दिवसाच्या कमाल तापमानामुळे बर्फ झपाट्याने वितळत आहे

  • चालू आठवड्यात गुलमर्गमध्ये कमाल तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपास

  • हिवाळ्यातील ०.४ अंश सेल्सिअस या सामान्य तापमानापेक्षा सध्याचे तापमान खूप जास्त

  • गेल्या पंधरवड्यात खोऱ्यातील दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा सहा ते नऊ अंशांनी जास्त

  • गुलमर्गमधील अफरावत आणि कोंगदूरी या उंचावरील भागातही स्किईंगसाठी पुरेसा बर्फ नाही

  • अनेक पर्यटकांनी काश्‍मीरला अन्य पर्याय शोधले असल्याची ‘ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ काश्मीर’ची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.