उत्तर कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू झाल्यानंतर असे कारखाने अन्य कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामधील ऊस अनधिकृतपणे व बेकायदेशीररीत्या गाळप करतात.
बेळगाव : पावसाअभावी ऊस उत्पादनात घट झाल्यामुळे बेळगावसह उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांना एक नोव्हेंबरनंतर हंगाम सुरू करण्यात यावा, असा आदेश राज्याचे व्यापार व औद्योगिक विभागाचे सचिव डॉ. रिचर्ड डिसोझा यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी नीतेश पाटील (Collector Nitesh Patil) यांना बजाविला आहे.
कर्नाटकामध्ये साखर कारखान्यांकडून (Sugar Factory) आपल्या मर्जीनुसार हंगाम सुरू करण्यात येतो. विशेषतः उत्तर कर्नाटकामध्ये हा प्रकार जादा आहे. यातून कारखान्यांकडून ऊस नेण्यासाठी स्पर्धा जाणवते. त्यामुळे अपरिपक्व ऊस गाळप होतो. परिणाम, साखर उताऱ्यासह उपपदार्थ उत्पादनावर दिसतो.
उत्तर कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू झाल्यानंतर असे कारखाने अन्य कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामधील ऊस अनधिकृतपणे व बेकायदेशीररीत्या गाळप करतात. त्यातून वादविवाद व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्याचा विचार करून कारखान्यांनी १ ते १५ नोव्हेंबर कालावधीमध्येच हंगामाला सुरुवात करण्याबाबत आदेश आहे.
कर्नाटकच्या मंत्री समितीच्या आठ जुलैला झालेल्या बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्याच्या साखर आयुक्तांनी ११ ऑगस्ट रोजी पत्र पाठवत उत्तर कर्नाटकातील कारखान्यांना तशा सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत १२ व १३ सप्टेंबरला बैठकी झाल्या आहेत. तेथे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
त्यात उत्तर कर्नाटकातील साखर कारखाने १ नोव्हेंबरपूर्वी सुरू न करणे या निर्णयाचा अंतर्भाव आहे. नियोजित तारखेपूर्वी कारखाने सुरू झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याबाबतचा उल्लेख डॉ. डिसोझा यांनी पाठविलेल्या पत्रात आहे. पावसाअभावी यंदा ऊस उत्पादन कमी झाले आहे. सर्वाधिक उसाचे उत्पादन बेळगावमध्ये घेतले जाते.
अथणी, कागवाड, कुडची, रायबाग आणि चिक्कोडी तालुक्यात जादा पीक येते. परंतु, यंदा या तालुक्यातही पावसाने ओढ दिल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. गतवर्षी २१ नोव्हेंबर २०२२ मध्ये हंगाम सुरु झाले होते. यंदाही या दरम्यान कारखाने सुरु करण्याबाबत तयारी सुरु आहे. २०२२-२३ मध्ये बेळगाव जिल्ह्यात २७,२०० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा २० लाख मेट्रिक टन कमी ऊस उत्पादन झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शासनाकडून एक नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याबाबत निर्देश आहेत. यामुळे दसरा, दिवाळी सण पार पडल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू करण्यात येतील. निश्चित एक नोव्हेंबरपासून कारखाने सुरू होणार नाहीत. मात्र, नोव्हेंबर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे.
- श्रीशैल कंकणवाडी, उपसंचालक, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.