नवी दिल्ली : ‘सेवा, संकल्प आणि समर्पण हाच भाजपचा आधार असून घराणेशाहीला बिलकूल थारा नसणे हेच भाजप व इतर पक्षांतील वेगळेपण आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. दिल्लीत आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप झाला. या अखेरच्या सत्रात मोदींनी कार्यकर्त्यांना जनतेच्या कायम संपर्कात राहण्याचा सल्ला दिला.
पक्षनेते भूपेंद्र यादव यांनी मोदींच्या ५० मिनीटांच्या भाषणाबाबत माध्यमांना माहिती दिली. ‘पक्ष कार्यकर्त्यांनी थेट जनतेशी जोडलेले रहावे, केवळ पुस्तकांतून ज्ञान मिळत नाही. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांतही हीच गोष्ट अंमलात आणून भाजप विजयपथावर जाईल,’ असा आत्मविश्वासही मोदींनी कार्यकर्त्यांमध्ये जागविला. पक्षाच्या इतिहासाचे महत्व सांगून मोदी म्हणाले की,‘‘भाजपला केंद्र आणि इतर अनेक राज्यांत आज जे स्थान मिळाले आहे त्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे पक्षाने सामान्य माणसाशी असलेली नाळ तुटू दिली नाही.
सत्ता असो वा नसो, भाजप कार्यकर्त्यांनी सदैव जनतेत जाऊन सेवा कार्य अखंड सुरू ठेवले. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांना सामोरे जातानाही भाजपने सामान्य माणसाच्या विश्वासाचा पूल बनावे.’’ जनतेशी जोडलेले राहिलात तरच तुमचे अनुभवविश्व समृद्ध होत राहील, अशीही सूचना केली.
मेहनत आणि जनसेवा
काँग्रेसवर हल्ला चढविताना मोदी म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांनी कधीही एखाद्या विशिष्ट घराण्याची सेवा केली नाही, तर मेहेनत व जनसेवा या दोन मार्गांवरूनच प्रगती केली. कार्यकर्त्यांनी हा रस्ता कधीही सोडू नये. कोरोना काळातही भाजप कार्यकर्त्यांनी सेवेचा वेगळा आदर्श उभा करून सत्तारूढ पक्षकार्यकर्तेही किती जनसेवा करू शकतात याचा वस्तुपाठ जगाला दाखवून दिला. जनसंघापासून गेली अनेक दशके पक्षाची निस्वार्थ सेवा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची चरित्रे नमो अॅपवर ‘कमलपुष्प’ या वेगळ्या विभागात देत आहोत, ती जरूर वाचा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.