नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे अंदाज व्यक्त करणाऱ्या एक्झिट पोलमुळे शेअर बाजारावर झालेल्या कथित परिणामांची सेबीद्वारे (प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) चौकशी व्हावी, अशी तृणमूल कॉंग्रेसने मागणी केली आहे. या मुद्द्यावर तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांचे शिष्टमंडळ मुंबईत सेबी अध्यक्षांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस(शरदचंद्र पवार)च्या खासदारही सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र तृणमूलने या मुद्द्यावर काँग्रेसशी संपर्कही साधला नसल्याची माहिती आहे.
शेअर बाजारातील कथित फेरफार आणि एक्झिट पोलच्या आधारे झालेल्या कथित ‘इनसाइडर ट्रेडिंग’च्या मुद्द्यावर सेबी अध्यक्षांशी चर्चा करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसने लोकसभेतील कल्याण बॅनर्जी आणि प्रतिमा मोंडल तर राज्यसभेतील सागरिका घोष आणि साकेत गोखले या खासदारांच्या शिष्टमंडळाची नियुक्ती केली आहे. या शिष्टमंडळाने सेबी अध्यक्षांना मंगळवारी (ता. १८) भेटण्याची वेळ मागितली आहे. एक्झिट पोल घेणाऱ्या सर्वेक्षण संस्थांनी शेअर बाजारावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांच्या अंदाजांमध्ये फेरफार केला होता काय? आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती अथवा संस्थांनी ३ जूनला झालेल्या उलाढालीत मोठा नफा कमावला आहे काय, याची सेबीद्वारे चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने पत्रात केली आहे.
काँग्रेसशी संपर्कच नाही
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सेबी अध्यक्षांच्या भेटीदरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) खासदारही उपस्थित राहू शकतील. यासाठी तृणमूलचे दोन्ही पक्षांशी बोलणे झाल्याचे समजते. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेसशी संपर्कही साधलेला नाही. या मुद्द्यावर काँग्रेसची मागणी संयुक्त संसदीय समितीची असली तरी तृणमूलने सेबीद्वारे चौकशीची मागणी चालविली असल्याने ‘इंडिया’ आघाडीतील मतभिन्नताही यानिमित्ताने समोर आली.
बंगाल पोटनिवडणुकीत डावे-काँग्रेसची युती
कोलकता : पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत डावे पक्ष आणि काँग्रेसने एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर दिनाजपूरमधील रायगंजची जागा काँग्रेससाठी सोडून इतर तीन जागा डावे पक्ष लढविणार असून त्यांनी उमेदवारही जाहीर केले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डाव्या-काँग्रेस युतीच्या पदरात फारसे काही पडले नाही. या अपयशाचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर यंदाचा लोकसभा निवडणुकीचा निकाल २०२१ च्या विधानसभा निकालाच्या तुलनेत बरा होता, असे या युतीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
हिंसाचाराच्या चौकशीसाठी समिती
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये वाढलेल्या राजकीय हिंसाचाराच्या चौकशीसाठी भाजपने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री व खासदार बिप्लब देव यांच्याकडे समितीच्या समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री रविशंकर प्रसाद, ब्रिजलाल आणि कविता पाटीदार हे सदस्य असतील. भाजपची समिती हिंसाचारग्रस्त भागांना भेट देईल आणि तेथील लोकांशी बोलून अहवाल तयार करेल. हा अहवाल पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुपूर्द केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.